|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वणव्याने घेतला युवकाचा बळी

वणव्याने घेतला युवकाचा बळी 

राजापुर तालुक्यातील जवळेथर धावलेवाडीतील घटना

वणवा भडकल्यामुळे गोठय़ाला लागली आग

आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात होरपळला

वार्ताहर /राजापूर

जंगलातील वणव्यामुळे गोठय़ाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी गेलेल्या युवकाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील जवळेथर येथे घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव प्रकाश यशवंत धावले (47) असे असून रविवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली.

राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी जवळेथर परिसरातील जंगलात वणवा लागला होता. हळुहळु वणवा गावातील धावलेवाडीतील उंबराचा वहाळ या ठिकाणी पोहचला. त्या भागात प्रकाश यशवंत धावले यांचा गुरांचा गोठा आहे. वणव्याची आग वेगाने गोठय़ाच्या दिशेने पसरत होती. प्रकाश धावले यांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धाव घेतली. मात्र दुपारचे ऊन आणि वेगाने वाहणारा वारा यामुळे काही क्षणातच गोठय़ाला आगीच्या ज्वाळांनी वेढले.

गोठय़ाला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी प्रकाश धावले यांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र आग आटोक्यात आणत असताना ते आगीत होरपळले गेले. आगीमध्ये गंभीर भाजल्याने त्यातच त्याचा अंत झाला. या घटनेची खबर शांताराम यशवंत धावले यांनी रायपाटण पोलीस दुरक्षेत्राला दिली. त्यानंतर मयत प्रकाश धावले यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत पोलीसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव करत आहेत.

Related posts: