|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘कलानंद कॉन्टेस्ट’मध्ये सिंधुदुर्गच्या चित्रकारांचे यश

‘कलानंद कॉन्टेस्ट’मध्ये सिंधुदुर्गच्या चित्रकारांचे यश 

कुडाळवेंगुर्ले तालुक्यातील कोचरा-गोसावीवाडी येथील राम मेस्त्राr यांच्या ‘पांगुळ बैल’ या पेंटिंगला ‘मेरीट ऍवॉर्ड फॉर महाराष्ट्र स्टेट’, तर कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे-भोगलेवाडी येथील सुरज शेलार यांच्या निसर्गचित्राला ‘सावंतवाडी सिटी ऍवॉर्ड’ जाहीर करण्यात आला आहे. प्रफुल्ला डहाणूकर आर्ट फाऊंडेशनच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या ‘इंटरनॅशनल कलानंद’ कॉन्टेस्ट’मध्ये ते सहभागी झाले होते. हे दोघे चित्रकार पेंटिंग क्षेत्रात कोल्हापूर येथे व्यावसायिक कलाकार म्हणून कार्यरत असून त्यांनी या क्षेत्रात ठसा उमटविला आहे. पणजी-गोवा येथील कला अकादमी येथे 1 मार्च रोजी या दोघांना ऍवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

राम व सुरज चित्रकलेचा छंद जोपासत आहेत. राम मेस्त्राr यांना चित्र, शिल्प व पेंटिंगची लहानपणापासूनच आवड आहे. त्यांचे शालेय शिक्षण पाट हायस्कूल, तर सुरज यांचे शालेय शिक्षण पणदूर हायस्कूलमध्ये झाले. या दोघांनी कोल्हापूरच्या दळवीज आर्टस् इन्स्टिटय़ूटमध्ये चित्रकलेचे धडे घेतले. त्यांची घरची परिस्थिती बेताची होती. कलेचा व्यासंग एकच असल्याने ‘एकमेका सहाय्य करू’ या भावनेतून पेंटिंग क्षेत्रात आपल्या करिअरची वाटचाल सुरू केली. या उमद्या चित्रकारांनी रेखाटलेल्या चित्रांची अनेक प्रदर्शने झाली आहेत. कोल्हापूर, बेंगलोर, पुणे शहरातील आर्किटेक्टनी त्यांची चित्रे खरेदी करून पसंती दर्शविली आहे.

या कलाकारांच्या कुंचल्यातून रेखाटलेली चित्रे बोलकी व नजरेत भरण्यासारखी असतात. त्यांच्या चित्रांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागातील या कलाकारांनी केलेली या क्षेत्रातील प्रगती अभिमानास्पद आहे.

 2016-17 च्या इंटरनॅशनल कलानंद कॉन्टेस्टमध्ये ते सहभागी होते. राम यांनी ‘पांगुळ बैल’ हा कोकणातील लोककला प्रकार रेखांकित केला होता. समाजातील वास्तवता, जगण्यातील संघर्ष, मनोरंजन अन् बोध चित्रित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या ऐतिहासिक संदर्भ व लोककलेची वास्तवता दर्शविणारी रचनाशैली त्यांनी या चित्रातून उभी केली, तर सुरज यांनी निसर्ग चित्रातून निसर्गाच्या सूक्ष्म छटा व व्यक्त होणारी मानवी मने यांची सुरेख गुंफण रेखाटली. निसर्ग आणि समाजातील कष्टकरी लोकांची भावमुद्रा आपल्या कुंचल्यातून बद्ध केली. या यशाबद्दल या कलाकारांचे कौतुक होत आहे.