|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा आरोप असलेल्या वृद्धाची आत्महत्या

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा आरोप असलेल्या वृद्धाची आत्महत्या 

मालवणतळगाव देऊळवाडी येथील नारायण कृष्णा दळवी (82) यांचा मृतदेह मंगळवारी सकाळी तळगावातील सार्वजनिक विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. एका अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादल्याची तक्रार या वृद्धाविरोधात असल्याने त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी मालवण पोलिसांनी सोमवारी दळवी यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलीला त्रास होऊ लागल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला खासगी रुग्णालयात नेले असता ती गरोदर असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तिची रवानगी निवारा केंद्रात करण्यात आली होती. मुलीचे कुटुंबीय रविवारी सायंकाळी मालवण पोलीस ठाण्यात पोहोचले. नारायण दळवी यांनी धमकी देत आपल्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार सदर मुलीने दिली. यावरून पोलिसानी नारायण दळवी याच्यावर गुन्हा दाखल केला. सदर मुलगी सहा ते सात महिन्यांची गरोदर आहे. मुलीच्या तक्रारीवरून नारायण दळवी याच्यावर अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांनी दिली.

सार्वजनिक विहिरीत मृतदेह सापडला

नारायण दळवी रात्री घरातून निघून गेले होते. त्यांची शोधाशोध करूनही ते सापडून आले नव्हते. असे असताना त्यांचा मृतदेह सकाळी तळगावातील सार्वजनिक विहिरीत सापडून आल्याने एकच खळबळ उडाली. दळवी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची चिठ्ठीही पोलिसांना सापडून आली नाही. दळवी यांचा मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढला होता. मृतदेहाचे विच्छेदन ओरोस याठिकाणी करण्यात आले. दळवी यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.