|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » बडवे मज मारिती

बडवे मज मारिती 

घन:शाम नीळकंठ नाडकर्णी हे प्रतिवादी बाळाजी कुसाजी पाटील यांचे वकील होते. अभियोगात प्रतिवादीची बाजू मांडताना ते म्हणाले, ‘पाटलांच्या घरात झालेल्या लग्नात शास्त्रात सांगितलेले कोणतेही संस्कार करण्यात आले नव्हते. तेथे पुरोहित असा कोणी आणलेलाच नव्हता. गणेशपूजन हा लग्नाच्या वेळी प्रारंभीचा विधी असतो तोही ह्या लग्नात केलेला नव्हता. वधूवरांनी एकमेकाच्या गळय़ात हार घालण्यापलीकडे येथे कोणताच संस्कार केलेला नव्हता. दक्षिणा कोणालाही देण्यात आलेली नव्हती. यास्तव ग्रामपुरोहित दक्षिणेवर हक्क सांगू शकत नाहीत. प्रतिवाद्यांसारख्या ज्ञातीच्या शुद्राकडे वेगळाच संस्कार करावयाचा असतो. तो संस्कारही केलेला नव्हता.’

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सर चार्लस सार्जंट यांनी तो अभियोग एका मुद्यावर फेरविचारासाठी परत पाठविला. कोणते विधी लग्नाच्या प्रसंगी केले होते आणि ते कोणाकडून करविले गेले होते, याविषयी वरि÷ न्यायालयाला माहिती पाहिजे होती. दोन्ही पक्षांकडील साक्षीदारांची पुन्हा साक्ष नोंदवून आपला निष्कर्ष वरि÷ न्यायालयाकडे निर्णयासाठी पाठवावा, अशी त्यांनी जिल्हा न्यायालयास आज्ञा केली.

जिल्हा न्यायालयाने आपला निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयास सादर केला. त्यानंतर 8 जानेवारी 1890 रोजी मुख्य न्यायमूर्ती सार्जंट आणि न्यायमूर्ती का. त्रि. तेलंग यांनी बाळाजी कुसाजी पाटील यांच्या बाजूने निवाडा केला. ह्यामुळे सत्यशोधक समाजाने नेमलेल्या संस्काराप्रमाणे जी लग्ने व्हावयाची ती कायदेशीर आहेत असे तत्त्व निर्विवादपणे प्रस्थापित झाले. या लग्न समारंभात पुरोहित कोणतेच विधी करत नव्हता. त्यामुळे काम नाही तर दाम नाही या तत्त्वाप्रमाणे पुरोहितांना कोणतीही दक्षिणा मिळणार नाही, हेही प्रस्थापित झाले. हा जोतीराव फुले आणि सत्यशोधक समाज यांचा मोठा विजय होता.

कोणत्याही धार्मिक कार्यासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे काय? हा प्रश्न येथे उपस्थित होतो. परमेश्वराशी माझे नाते प्रस्थापित करण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही, असे जाहीर करून मार्टिन ल्यूथर किंग यांनी ख्रिश्चन धर्मातही एक वादळ निर्माण केले होते.

त्यावेळीही धर्मपीठे होतीच आणि या धर्मपीठाकडे प्रत्यक्ष तक्रार नोंदवून किंवा तक्रारीची धमकी देऊन सनातनी मंडळींनी काही कमी अन्याय केलेले नाहीत. याच मंडळींच्या धर्मपीठाने ज्ञानदेवादी भावंडांच्या आई वडिलांना देहान्त शासनाची शिक्षा दिली. तुकाराम महाराजांची अभंगाची गाथा इंद्रायणी नदीत बुडवायची आज्ञा याच पुरोहितशाहीने केली. आणि चोखोबांवर चोरीचा आळ घेऊन याच पुरोहित बडव्यांनी त्यांना अमानुष मारहाण केली. चोखोबा देवाची करुणा भाकतात –

धांव घाली विठु आता। चालू नको मंद।

बडवे मज मारिती। ऐसा काही तरी अपराध।।