|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताचा डाव 189 धावातच खुर्दा, लियॉनचे 8 बळी!

भारताचा डाव 189 धावातच खुर्दा, लियॉनचे 8 बळी! 

बेंगळुरातील दुसरी कसोटी, पहिला दिवस : केएल राहुलची 90 धावांची एकाकी झुंज,

वृत्तसंस्था/ बेंगळूर

ऑफस्पिनर नॅथन लियॉनने अवघ्या 50 धावात 8 फलंदाज गारद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने येथील दुसऱया कसोटी सामन्यात यजमान भारताचा पहिला डाव अवघ्या 189 धावांमध्येच खुर्दा केला. लियॉनसाठी ही कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली. भारतीय संघातर्फे सलामीवीर केएल राहुलने 205 चेंडूंमध्ये 9 चौकारांसह 90 धावांची एकाकी झुंज दिली. पण, इतका अपवाद वगळता अन्य एकही भारतीय फलंदाज अगदी तिशीच्या घरात देखील पोहोचू शकला नाही.

शनिवारी, या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकल्यानंतर अपेक्षेप्रमाणे प्रथम फलंदाजी स्वीकारली खरी. पण, पहिला डाव अवघ्या 189 धावांमध्येच गुंडाळल्या गेल्याने हा भारतीय संघासाठी जबरदस्त धक्का ठरला. प्रत्युत्तरात दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने 16 षटकात बिनबाद 40 अशी सावध सुरुवात करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. डावखुरा वॉर्नर 23 तर युवा सलामीवीर रेनशॉ 15 धावांवर खेळत आहेत.

भारताच्या पहिल्या डावात युवा आक्रमक फलंदाज केएल राहुलची 90 धावांची झुंजार खेळी लक्षवेधी ठरली. शतक अवघ्या 10 धावांनी हुकले असले तरी त्याने अनेक भागीदाऱया साकारत संघाचा डाव साकारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण, यानंतरही भारताला अपेक्षित मजल गाठण्यापासून कित्येक कोस दूरच राहावे लागले. यजमान संघाचे शेवटचे 5 फलंदाज 15 धावांमध्येच गारद झाले, ही देखील आणखी एक शोकांतिका ठरली.

केएल राहुलशिवाय, केवळ करुण नायरलाच (26) वैयक्तिक 20 धावांचा टप्पा सर करता आला. पुनरागमन करणाऱया अभिनव मुकूंदला (0) मिशेल स्टार्कचा फुलटॉस ऍक्रॉस खेळण्याचा प्रयत्न चुकल्यानंतर पायचीत होत तंबूत परतावे लागले. राहुल व चेतेश्वर पुजारा (17) यांनी दुसऱया गडय़ासाठी 61 धावांची भागीदारी साकारत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केएल राहुलने स्टार्क व हॅझलवूड यांच्या जलद गोलंदाजीवर आक्रमणावर भर दिला. आपल्या खेळीतील पहिले पाच चौकार तर त्याने थर्ड स्लीप ते पॉईंट याच क्षेत्रातून वसूल केले होते.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फिरकीपटू लियॉनने येथे सर्वाधिक धावा जमवणाऱया केएल राहुलसह चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, अश्विन, साहा, रवींद्र जडेजा व इशांत शर्मा यांना तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यान, त्याने भारताविरुद्ध कसोटीमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या निकषावर ब्रेट ली याला मागे टाकले.

पुण्यात स्टीव्ह ओकिफे, बेंगळुरात नॅथन लियॉन!

Australia's Nathan Lyon, without cap, holds the ball to celebrate taking five wickets during the first day of their second test cricket match against India in Bangalore, India, Saturday, March 4, 2017. (AP Photo/Aijaz Rahi)

यापूर्वी पुण्यातील पहिल्या कसोटी सामन्यात स्टीव्ह ओकिफे भारताचा कर्दनकाळ ठरला होता. त्याने अवघ्या 70 धावांमध्ये भारताचे 20 पैकी 12 फलंदाज गारद करत विराटसेनेचे विमान जमिनीवर ‘लँड’ होईल, याची पुरेपूर काळजी घेतली होती. तोच कित्ता आता ओकिफेचा वरिष्ठ सहकारी-ऑफस्पिनर नॅथन लियॉनने गिरवला. लियॉनने पहिल्या डावात 22.2 षटकात 50 धावात 8 बळी घेतले. यात त्याने 4 षटके निर्धाव टाकली. दरम्यान, पुण्यातील पहिल्या कसोटीत ओकिफेने पहिल्या डावात 13.1 षटके गोलंदाजी करत 35 धावात 6 तर दुसऱया डावात 15 षटकात 35 धावातच 6 बळी, अशी भेदक गोलंदाजी साकारली होती. त्याच दिशेने लियॉनने आता पहिले पाऊल टाकले आहे.

भारताचे शेवटचे 5 फलंदाज अवघ्या 15 धावात तंबूत!

प्रारंभी, केएल राहुलने एकाकी झुंज देत 90 धावांची खेळी साकारली, त्यावेळी त्याच्या बळावरच भारताची लढाई सुरु होती. पण, रविचंद्रन अश्विन सहाव्या गडय़ाच्या रुपाने बाद झाल्यानंतर यजमान संघाची तेथूनच खऱया अर्थाने पडझड सुरु झाली. अश्विन बाद झाला, त्यावेळी भारताची 6 बाद 174 अशी स्थिती होती. त्यानंतर उर्वरित फलंदाज अवघ्या 15 धावांमध्येच तंबूत परतले हा सर्वात मोठा धक्का ठरला. अश्विननंतर साहा (7 बाद 178), जडेजा (8 बाद 188), केएल राहुल (9 बाद 189) ठरावीक अंतराने बाद होत राहिले आणि इशांत शर्मा शेवटच्या गडय़ाच्या रुपाने परतल्यानंतर भारताचा डाव 189 धावांमध्ये खुर्दा झाला.

संक्षिप्त धावफलक

भारत पहिला डाव : 71.2 षटकात सर्वबाद 189 (केएल राहुल 205 चेंडूत 9 चौकारांसह 90, करुण नायर 39 चेंडूत 3 चौकारांसह 26, चेतेश्वर पुजारा 17, अजिंक्य रहाणे 17, विराट कोहली 12, अश्विन 7. अवांतर 16. नॅथन लियॉन 22.2 षटकात 50 धावात 8 बळी, मिशेल स्टार्क 15 षटकात 1/39, स्टीव्ह ओकिफे 21 षटकात 1/40).

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : 16 षटकात बिनबाद 40. (डेव्हिड वॉर्नर 51 चेंडूत 1 चौकारासह खेळत आहे 23, मॅट रेनशॉ 47 चेंडूत 1 चौकारासह खेळत आहे 15. अवांतर 2).