|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » जिल्हा परिषदेवर भाजपाचाच अध्यक्ष

जिल्हा परिषदेवर भाजपाचाच अध्यक्ष 

प्रतिनिधी/ मिरज

सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल. शिवाय जिह्यातील पाच पंचायत समितींवर भाजपाचे सभापती सत्तारुढ होतील, असा दावा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकारांशी बोलतना केला. जिल्हा परिषद अध्यक्षासाठी शिवसेना सोडून भाजपाचे संख्याबळ 34 झाले आहे. पण शिवसेनेला सोबत घेऊनच अध्यक्ष निवडला जाईल, असेही ते म्हणाले.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरील पदाधिकारी निवडीसंदर्भात शनिवारी शहरातील महाबळ फार्महाऊस येथे भाजपाच्या जिल्हा कोअर कमिटीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार विलासराव जगताप, आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार शिवाजीराव नाईक, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, राजेंद्र देशमुख, भगवानराव साळुंखे, गोपीचंद पडळकर, दिपकबाबा शिंदे, सौ.निताताई केळकर यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, प्रकाश बिरजे, बंडोपंत देशमुख, विठ्ठल पाटील, शेखर इनामदार, गजेंद्र कुल्लोळी, मोहन वनखंडे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला सर्वाधिक सांगली जिह्यात चांगले यश मिळाले आहे. 60 पैकी 25 जागा जिंकून प्रथमच भाजपा एक नंबरचा पक्ष बनला आहे. केंद्र आणि राज्यातील पारदर्शी कारभाराचे हे यश आहे. सध्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी खलबते सुरू असली तरी अध्यक्षपदासाठी आवश्यक संख्याबळ भाजपाने केव्हाच पार केले आहे. सध्या भाजपाकडे शिवसेना वगळता 34 सदस्य आहेत. पण शिवसेनेला सोबतीला घेऊनच अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी निवडले  जातील. याशिवाय मिरज, जत, पलूस, कडेगांव आणि आटपाडी या पाच पंचायत समितीवर भाजपाचे सभापती सत्तारुढ होतील, असा विश्वासही यावेळी पृथ्वीराज देशमुख आणि खासदार संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला. शिराळा, तासगांवमध्ये आम्ही कमी पडलो. अन्यथा जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता आली असती. पण सध्याचे यशही मोठे आहे, असेही ते म्हणाले.

केंद्र आणि राज्यातील पारदर्शी कारभाराला जनतेने साथ दिली आहे. मुंबई महापालिकेचा महापौरही सेना-भाजपा युतीचाच होईल, असा दावाही त्यांनी केला. पहिला कोण?, दुसरा कोण?, किती दिवस? हे महत्वाचे नाही. मुंबईत भाजपा-शिवसेनेला एकत्र आल्याशिवाय गत्यंतर नाही, असेही खासदार संजय पाटील यावेळी म्हणाले. भविष्यात सांगली जिल्हा परिषदेचा कारभारही पारदर्शी व्हावा, यासाठी नुतन सर्व सदस्यांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वैयक्तिक आणि सार्वजनिक कामे कशा पध्दतीने करावयाची, याचे इतंभूत मार्गदर्शन त्यांना होणार आहे. त्याची प्रक्रिया अल्पावधीत सुरू होईल, असेही खासदार संजय पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

Related posts: