|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मुत्यानट्टी घटनेच्या सहेली संघटनेतर्फे निषेधार्थ मोर्चा

मुत्यानट्टी घटनेच्या सहेली संघटनेतर्फे निषेधार्थ मोर्चा 

प्रतिनिधी/ बेळगाव

महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. त्याचप्रमाणे मुत्यानट्टी बलात्कार प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई क्हावी या मागणीसाठी जायंटस ग्रुप ऑफ सहेली संघटनेतर्फे शहरातून भव्य मोर्चा काढण्यात आला. महिला जागृतीचे दर्शन घडविणारे अनेक चित्ररथ या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातून निघालेला हा मोर्चा लक्षवेधी ठरला होता.

धर्मवीर संभाजी चौकातील संभाजी महाराजांच्या पुतळय़ाला महापौर संज्योत बांदेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर पोलीस उपायुक्त जी. राधिका यांनी महिलांना मार्गदर्शन केले.

किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, डॉ. राजेंद्र प्रसाद चौक येथे मोर्चाची सांगता झाली. मोर्चामध्ये झांजपथक, अश्वारुढ बालिका यांच्यासह विविध वेशभूषा, केलेले बालचमू आणि महिला वर्ग मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. तसेच महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधातील फलकांचे दर्शन यावेळी करण्यात आले.

या मोर्चाचे नेतृत्त्व जायंटस सहेलीच्या अध्यक्षा रुपा चोळाप्पाचे, सचिव शीतल मुंदडा, शिल्पा केकरे, अश्वगंधा कुगजी, ज्योती माईन यांच्या नेतृत्त्वाखाली अन्य पदाधिकारी वर्गाने केले होते. जायंटसचे राजू माळवदे, विक्रांत पोटे पाटील, महेश हंडे यांच्यासह इतर पदाधिकारी हजर होते.