|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » मनोरंजन » ‘सख्या रे’ मालिकेत सुप्रिया पाठारेंची एन्ट्री

‘सख्या रे’ मालिकेत सुप्रिया पाठारेंची एन्ट्री 

कलर्स मराठीवरील ‘सख्या रे’ मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. समीर आणि रणविजय या दोन सारख्या चेहऱयांच्या व्यक्तीने निर्माण झालेले संशयाचे वलय प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे यात वाद नाही. अत्यंत कुशलतेने समीर आणि रणविजयचे पात्र मालिकेमध्ये रेखाटण्यात आले आहे. आता हा नक्की समीर आहे की रणविजय हे मालिका बघितल्यावरच कळेल. आता या सगळय़ा गोंधळामध्ये प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला या मालिकेमध्ये एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. या पात्राचे नाव आहे सिद्धेश्वरी. हे पात्र आपल्या चौफेर अभिनयाने प्रेक्षकांची दाद मिळवणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे साकारणार आहे.

सिद्धेश्वरी म्हणजे मालिकेमधील रणविजयची काकू. बराच काळ बाहेर राहिल्यानंतर आता सिद्धेश्वरी पुन्हा जहागीरदार यांच्या वाडय़ावर आली आहे. रणविजय अचानक लग्नाच्या दिवशी गायब झाला आहे आणि तो आजपर्यंत सापडलेला नाहीये. ही बातमी सिद्धेश्वरीला कळताच ती वाडय़ावर येण्याचा निर्णय घेते. जहागीरदार यांच्या संपत्तीवर आणि वाडय़ावर तिचा डोळा आहे. रणविजयच वाडय़ावर नसण्याचा फायदा घेऊन जहागीरदारांच्या वाडय़ावर सत्ता गाजविण्याच्या हेतूने ती वाडय़ावर आलेली आहे. पण प्रियंवदा तिच्या या हेतूला पूर्ण होऊ देईल? ती सिद्धेश्वरीच्या मार्गामध्ये कुठले अडथळे निर्माण करेल? तसेच रणविजयला गायब करण्यामध्ये सिद्धेश्वरीचा तर हात नाही ना? सिद्धेश्वरीच्या येण्याने मालिकेला कुठले नवे वळण येणार, समीर-रणविजयच्या मागचं गुपित… या आणि अशा अनेक प्रश्नांची रंजित उत्तरं ‘सख्या रे’ या मालिकेत आगामी काळात मिळणार आहेत.

Related posts: