|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » 2017 साठी चीनकडून 6.5 टक्के विकासदराचे लक्ष्य

2017 साठी चीनकडून 6.5 टक्के विकासदराचे लक्ष्य 

बीजिंग

 2017 सालासाठी चीनने 6.5 टक्के विकासदराचे लक्ष्य निर्धारित केले आहे. जगाच्या दुसऱया सर्वात मोठय़ा अर्थव्यवस्थेने मागील वर्षाच्या 6.5 ते 7 टक्क्यांच्या तुलनेत या वर्षासाठी अनुमानित विकासदरात घट केली आहे. प्रत्यक्ष आर्थिक कार्यात देश चांगली कामगिरी करेल असा आशावाद चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांनी नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाच्या अनावरणप्रसंगी व्यक्त केला.

अनुमानित विकासदराचे लक्ष्य हे आर्थिक तत्वे आणि प्रत्यक्ष स्थितीत संतुलन साधणारे आहे. स्थिर बाजाराची अपेक्षा आणि देशाच्या रचनेत सुधाराला याद्वारे मदत होईल. तसेच या विकासदरामुळे आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या उभारणीचे लक्ष्य गाठण्यास हातभार लागेल असे केकियांग यांनी वक्तव्य केले. रोजगाराच्या संधी सुनिश्चित करणे आणि लोकांच्या राहणीमानात सुधारासाठी निरंतर विकास आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले.

मागील वर्षी चीनने 6.7 टक्के विकासदर गाठला होता. हा दर मागील 26 वर्षातील नीचांकी ठरला होता. चालू वर्षासाठी चीनने शहरी रोजगार निर्मितीकरता 11 दशलक्षाचे लक्ष्य बाळगले आहे. हा आकडा 2016 च्या तुलनेत 1 दशलक्षाने वाढीव आहे. चीनने अलिकडेच 5 लाख कर्मचाऱयांच्या कपातीची घोषणा करत या लोकांना इतरत्र सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. चीनमध्ये दरवर्षी 7 दशलक्ष पदवीधर रोजगाराच्या बाजारात दाखल होत असतात.

Related posts: