|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » माकडतापाचा आणखी एक बळी

माकडतापाचा आणखी एक बळी 

प्रतिनिधी/ सावंतवाडी

बांद्यात गेल्या आठवडय़ात माकडतापाने दोघाजणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यानंतर रविवारी माकडतापाने आणखी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
सौ. महिमा महिंद्र हडपडकर असे त्या महिलेचे नाव असून ती बांदा-पानवळ येथील आहे.

गेल्या आठवडय़ात बांद्यात माकडतापाने दोघांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्यानंतर प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. माकडतापाबाबत उपाययोजना गतिमान केल्या असतानाच हडपकर यांचे निधन झाल्याने आरोग्य यंत्रणेसमोर माकडतापाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मृत महिला पानवळ येथील असून हा भाग डेगवे गावाशी जोडला आहे. डेगवे गावात गतवर्षी माकडतापाची अनेक जणांना लागण झाली होती. त्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे बांदा भागात पुन्हा माकडतापाबाबत भीतीचे सावट आहे.

             उपाययोजना सुरू असूनही मृत्यू, ग्रामस्थांत संताप

बांद्यात आतापर्यंत माकडतापाने चौघांचा मृत्यू झाला. गेल्या आठवडय़ात दोघांचा मृत्यू झाल्याने प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी माकडतापासंदर्भात लक्ष घालून प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर माकडताप पसविणाऱया गोचिड निर्मुलनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. तरीही महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे माकडतापाबाबत भीतीची छाया अधिकच गडद झाली आहे. माकडतापाची लागण एका भागातून दुसऱया भागात झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे सर्वत्र उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.