|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोणत्याच पदाची अभिलाषा बाळगली नाही

कोणत्याच पदाची अभिलाषा बाळगली नाही 

प्रतिनिधी/ पणजी

जनतेचा कौल काँग्रेस पक्षाला मिळूनसुद्धा सरकार स्थापन करता आले नाही, याबद्दल खंत प्रकट करून त्यास आपण जबाबदार नसल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केला आहे. आपण कोणत्याच पदाची अभिलाषा कधीच बाळगली नाही, तसेच कोणत्याही त्यागास तयार होतो, असेही ते म्हणाले.

  गोवा फॉरवर्ड व मगोपने तशी अट घालून आणि पत्रे देऊन पाठिंबा देण्याची गरज होती (जसा भाजपला दिला तसा) असेही निवेदन फालेरो यांनी केले, तथापि सरकार स्थापनेची संधी वाया घालवण्यास जबाबदार कोण? याचे उत्तर मात्र त्यांनी शेवटपर्यंत दिले नाही. काल शुक्रवारी पणजीतील काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत फालेरो यांनी सांगितले की, काँग्रेसला सरकार स्थापन करण्यास अपयश आले म्हणून माझ्यावर दोषारोप करण्यात येत आहेत.

 गोवा फॉरवर्डची माशी कुठे शिकली?

गोवा फॉरवर्ड पक्षाने व त्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी काँग्रेसशी बोलणी करण्याचे आणि त्यानंतर पाठिंबा देण्याचे मान्य केले होते. मी (फालेरो) काँग्रेस विधीमंडळ गटाचा नेता म्हणजे मुख्यमंत्री नसावा ही सरदेसाई यांची अट मान्य करण्यात आली होती, परंतु माशी कुठे शिंकली कोण जाणे आणि गोवा फॉरवर्डने भाजपला पाठिंबा दिल्याचे वृत्त आले.

 खंवटेना काँग्रेसने पाठिंबा दिला होता

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना काँग्रेसने पाठिंबा मतदानापूर्वीच दिला होता, तथापि त्यांनीही आयत्यावेळी भाजपला पत्र दिल्याचे आम्हाला कळले, असे फालेरो यांनी निदर्शनास आणले.

भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय गोवा फॉरवर्डने अर्थात विजय सरदेसाई यांनी निकालापुर्वीच घेतला होता, असा दावाही फालेरो यांनी केला. काँग्रेस विधीमंडळ गटाचे नेते म्हणून आमदार चंद्रकांत कवळेकर यांची निवड एकमताने करण्यात आली असून सध्या तरी तेच त्या पदावर राहतील व त्यात कोणताही बदल होणार नाही. ते अनेकदा निवडून आले असून त्यांना संधी मिळणे, देणे आवश्यक असल्याचे मत प्रदर्शनही फालेरो यांनी केले.