|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » प्रशांत किशोरांना शोधणाऱयास 5 लाख रुपयांचे ईनाम !

प्रशांत किशोरांना शोधणाऱयास 5 लाख रुपयांचे ईनाम ! 

काँग्रेस कार्यालयाबाहेर लागले पोस्टर

वृत्तसंस्था/ लखनौ

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यालयाबाहेर एक पोस्टर लावण्यात आले आहे. यात राजकीय व्यूहरचनाकार प्रशांत किशोर यांना शोधणाऱयास 5 लाख रुपयांचे ईनाम देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. उत्तरप्रदेश निवडणुकीसाठी प्रशांत यांनीच रणनीति बनविली होती. पक्षाने 105 जागांवर निवडणूक लढविली, परंतु 7 ठिकाणीच विजय मिळविता आला.

हे पोस्टर काँग्रेसचे राज्य सचिव राजेश सिंग यांनी जारी केले आहे. यात प्रशांत किशोर यांना ‘स्वयंभू चाणक्य’ संबोधिण्यात आले. 220 जागांवर विजय मिळवून देईन, जर यापेक्षा कमी जागा आल्या तर मला वेडा घोषित करा असे किशोर यांनी कार्यकर्ता संमेलनात म्हटले होते.

त्यानंतर आघाडी झाली, तर 105 जागांवरून  एका देखील जागेवर विजय झाला नाही तर आपल्याला वेडा घोषित करुन हाकला असे किशोर यांनी वक्तव्य केले होते. परंतु जेव्हापासून त्यांनी पक्षाचा ऐतिहासिक पराभव करविला आहे, तेव्हापासून नजरेस पडत नाहीत. हे त्यांचेच कारस्थान आहे, सप आणि काँग्रेसला पराभूत करीन अशी सुपारी ते भाजपकडून घेऊन आले होते असे सिंग यांनी सांगितले. यापेक्षा अधिक चांगली कामगिरी आम्ही 2012 मध्ये केली होती. 27 जागा आम्ही मिळविल्या होत्या आणि मतांची टक्केवारी देखील वाढविली होती. मोठमोठय़ा गोष्टी सांगणारे पीके आपली रक्कम घेऊन पसार झाले असा आरोपही त्यांनी केला.

मोठय़ा नेत्यांशी गैरवर्तन

पीके प्रत्येक बैठकीत मोठय़ा नेत्यांना बोलू द्यायचे नाहीत. त्यांच्या अनुभवांकडे डोळेझाक करायचे. ज्याप्रकारे ते नेत्यांसोबत गैरवर्तन करायचे ते चुकीचे होते. यामुळे आम्ही त्यांना शोधून आणणाऱयास 5 लाख रुपयांचे ईनाम देऊ असे राजेश यांनी म्हटले.