|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या आत्महत्यासत्राला होताहेत 31 वर्ष पुर्ण

महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या आत्महत्यासत्राला होताहेत 31 वर्ष पुर्ण 

डॅनियल खुडे/ सातारा

यवतमाळ जिह्यातील साहेबराव करपे या शेतकऱयाने पत्नी मालती व चार आपत्यांसह कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. तो दिवस होता 19 मार्चचा ! आज या घटनेला 31 वर्ष पूर्ण होत आहेत. या आत्महत्येची पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली आहे. आज हा आकडा एक लाख आत्महत्येपर्यंत पोहोचला आहे. आज ही शेतकऱयांच्या कर्जमाफीवरून विधी मंडळात लढाई सुरू आहे. 19 मार्च रोजीच महाराष्ट्राच्या शेतकऱयांची दु:ख स्थिती संपवावी म्हणून याच दिवशी शेतकऱयांच्या विविध संघटना, शेतकरी एक दिवस उपवासाचे आंदोलन करणार आहे. 

19 मार्च 1986 या दिवशी साहेबराव शेषराव करपे या यवतमाळ जिह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाण गावातील शेतकऱयाने पत्नी मालती आणि 4 आपत्यांसह आत्महत्या केली. त्यादिवशी ते आपल्या संपुर्ण कुटुंबाला घेऊन पवनारच्या दत्तरामपूर आश्रमात गेले होते. तेथे रात्री जेवणात झिंक फॉसफेट हे विषारी द्रव्य मिसळून साहेबराव यांनी स्वत:सह कुटुंबाला संपवून घेतले होते. आत्महत्येपुर्वी साहेबरावांनी पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी आत्महत्येमागची सविस्तर कारणे लिहून ठेवली होती. उदरनिर्वाहाचे साधन शेती. ती परवडत नाही. दरवर्षी तोटा वाढतो आहे. घेतलेली कर्जे फेडता येत नाहीत. चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याजाचा विळखा वाढतो आहे. परतफेड करता येत नसल्याने वारंवार अपमानीत व्हावे लागत आहे. विजेचे बिल भरता येत नाही. शेतकर्यांची दु:खत कैफियत सांगणारी अशी बरीच सारी कारणं सांगून साहेबरावांनी जगाचा निरोप घेतला होता. या घटनेने तेव्हा महाराष्ट्र हादरून गेला होता. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी या आत्महत्येची गंभीर दखल घ्या. धोरणे बदला अन्यथा अशा आत्महत्या रोज होतील. असा इशारा सरकारला तेव्हा दिला होता. त्यांचा हा इशारा लवकरच खरा ठरला. काही दिवसातच विदर्भात शेतकरी आत्महत्याचे सत्र सुरू झाली. दररोज शेतकरी आत्महत्येच्या करूण कहाण्यांनी वर्तमानपत्रांची पाने रंगू लागली. या आत्महत्यांची कारणं साहेबरावांच्या आत्महत्येसारखीच होती. 

गेल्या 31 वर्षात एक लाखापेक्षा अधिक शेतकर्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. त्याशिवाय शासनाच्या निकषात न बसलेल्या हजारो आत्महत्या होतात त्या वेगळ्याच. एखाद्या युद्धात, दुष्काळात, साथीच्या रोगातही एवढी माणसं कधी गेली नाहीत. विदर्भातील शेतकर्यांच्या या आत्महत्यांचा वेग एवढा भयानक आहे की त्यामुळे इंग्रजी वर्तमानपत्र विदर्भाचा उल्लेख मशेतकर्यांची स्मशानभूमीफ असा करत आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्यसरकारने शेतकर्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या. स्वामीनाथन, मिश्रा, नरेंद्र जाधव असे अनेक आयोग निर्माण झाले. त्यांच्या शिफारशीनुसार शेतकर्यांच्या मदतीचे पॅकेजेस जाहिर झाले. 2006 मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे विदर्भात येऊन गेले. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनीही समस्येची गंभीरता जाणून घेतली. एकदा कर्जमाफी झाली पण समस्या जैसेथे आहे. शेतकरी मरतोच आहे. 

         शेतकरी विरोध कायदे संपवावे यासाठी अनेक वर्ष संघर्ष करीत असलेले अमर हबीब, अच्युत गंगणे यांच्या किसानपुत्र आंदोलन या संघटनेने येत्या 19 मार्च रोजी अन्नदात्यासाठी एक दिवसाचा उपवास. असा एक कार्यक्रम जाहिर केला. या दिवशी किसानपुत्रचे संपुर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते एक दिवसाचा उपवास करणार आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर, औरंगाबाद, अमरावती, अंबेजोगाई, कारंजा, दर्र्यापुर आदि प्रमुख शहरांसह विदर्भ मराठवाडय़ातील अनेक गावात हा उपवास पाळला जाणार आहे. सर्व नागरिकांनी शेतकर्यांच्या व्यथन विषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी या उपवासात सहभागी व्हावे असे आवाहन किसानपुत्र तर्फे करण्यात आले आहे. तसेच एक दिवस अन्न त्यागाचा मुख्य कार्यक्रम साहेबराव चव्हाण यांच्या चिलगव्हाण या गावी होणार आहे. ते संपुर्ण गाव या दिवशी सुतक पाळणार आहे. गावातील एकही चुल त्यादिवशी पेटणार नाही. यवतमाळ जिह्यातील अनेक शेतकरी दारापुढे ठिपक्यांची रांगोळी घालून उपवास करणार आहेत. 

शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कर्जमुक्ती या विषयाने राजकारणात पुन्हा एकदा जोर घेतला आहे. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूकीत भाजपने आपल्या जाहिरनाम्यामध्ये शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याच आश्वासन दिल्याने तशाच प्रकारची कार्यवाही महाराष्ट्रातही व्हावी हा आग्रह प्रथम शिवसेनेने धरला. आता याच मुद्यावर शिवसेनासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस सरकारला धारेवर धरले आहे. ही लढाई विधीमंडळात सुरू असतानाच या सामुहिक अन्नत्याग आंदोलनातून मरणाच्या दारात उभ्या असलेल्या शेतकर्याला दिलासा मिळून तो मागे फिरेल आणि सरकार शेतकरी विरेधी कायद्याबाबत नव्याने काही विचार करेल. अशी शेतकर्यासह सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे