|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खनिजवाहू ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार

खनिजवाहू ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार ठार 

प्रतिनिधी/ धारबांदोडा

सुकतळे-मेले येथे खनिजवाहू टिप्पर ट्रकखाली सापडल्याने दुचाकीस्वाराचा खनिजवाहू ट्रकचालकाचा मृत्यू झाला. राजा सुलदाळ (38, रा. विकासवाडा-कुळे) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून शनिवारी दुपारी 3 वा. सुमारास येथील पेट्रोलपंपजवळ हा अपघात झाला. या घटनेमुळे येथील बेशिस्त ट्रक पार्किंगविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 कुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजा सुलदाळ हा जीए 09 बी 4339 या हिरोहोंडा पॅशन दुचाकीवरुन पेट्रोल भरण्यासाठी पंपवर आला होता. पेट्रोल पंपपासून काही अंतरावर त्याने आपला टिप्पर ट्रक पार्क करुन ठेवला होता. दुचाकीला पेट्रोल भरल्यानंतर पुन्हा तो पार्क केलेल्या ट्रकजवळ जात होता. याचवेळी खनिज माल भरण्यासाठी रांगेत थांबलेला जीए 09 यू 5096 या क्रमांकाचा टिप्पर ट्रक समोरुन वेगात आला. या ट्रकने दुचाकीला ठोकर दिल्याने राजा हा दुचाकीसह ट्रकखाली सापडला. अत्यवस्थ स्थितीत त्याला इस्पितळात नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. मयत राजा याच्या पश्चात पत्नी व तीन लहान मुले आहेत.

 दरम्यान ज्याठिकाणी हा अपघात झाला, तेथे मोले-बेळगाव महामार्गाच्या बाजूला मोठय़ाप्रमाणात खनिवाहू ट्रक बेशिस्तपणे पार्क केले जातात. त्यामुळे अपघाताचा वाढता धोका निर्माण झाला आहे. वाहतूक किंवा कुळे पोलिसांचेही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत.