|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » वेदगंगेत महिन्यात दुसऱयांदा पाणी

वेदगंगेत महिन्यात दुसऱयांदा पाणी 

वार्ताहर/ निपाणी

काळम्मावाडी करारातून मिळणाऱया पाण्यामुळे वेदगंगा नदी परिसरात हरितक्रांती घडली आहे. शेतीसह परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निकालात निघाला आहे. पण यंदा अनियोजित पाणी पुरवठय़ामुळे वेदगंगा परिसरात गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात पाणी आल्यानंतर ते काही काळात गायबही झाले. त्यामुळे शेतकऱयातून चिंता व्यक्त होत होती. त्याची दखल घेत आमदार शशिकला जोल्ले यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे 19 रोजी सर्वांनाच अनुभवायला मिळाले. कारण वेदगंगेत महिन्यात तब्बल दुसऱयांदा पाणी सोडण्यात आले. यामुळे शेतकरीवर्गात समाधान व्यक्त होत आहे.

काळम्मावाडी करारानुसार जर पावसाळय़ात धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास कर्नाटकाच्या वाटय़ाला 3 टीएमसी पाणी द्यावे लागते. गतवर्षी पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे यंदा पुरेसे पाणी उपलब्ध होणार म्हणून वेदगंगा परिसरात शेतकऱयांनी ऊस लागवड क्षेत्रात वाढ केली आहे. झालेल्या गळीत हंगामात उसाला मिळालेला चांगला भाव हे देखील याला पूरक असे कारण आहे.

गतवर्षी पाणलोट क्षेत्रात धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी पूरक पाऊस झाला असला तरी वेदगंगा परिसरात मात्र तसा पूरक पाऊस झालेला नाही. त्यातच उष्मांक वाढताना वाढत्या बाष्पीभवनातून पाणी गरज वाढली आहे. शेती पिके पाण्याविना सुकू लागली आहेत. पण पाटबंधारे विभाग मात्र याकडे गांभीर्याने लक्ष न देता दुर्लक्ष करत होता. यातून समस्या अधिकच गंभीर बनत चालली होती.

याबाबत शेतकऱयांच्या तक्रारी वाढू लागताच आमदार शशिकला जोल्ले यांनी तातडीने लक्ष घालत गांभीर्याने विषयाची माहिती घेतली. यानंतर संबंधित अधिकारीवर्गासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाणी समस्या निकालात काढण्यासाठी पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे काळम्मावाडीचे पाणी वेदगंगेत मार्चमध्ये पोहोचण्यासाठी चिमगाव ते चिखली व निढोरी ते म्हाकवे अशा वेदगंगा नदीवरील तिरावर उपसाबंदी लागू केली आहे. ही उपसाबंदी चार दिवसांची असून मंगळवारपर्यंत असणार आहे. यामुळे येत्या चार दिवसात वेदगंगा नदी दुथडी भरून वाहण्यास व पाणीसाठा होण्यास मदत होणार आहे.

पाणी नियोजनाची गरज

मार्चमध्ये दुसऱयांदा पाणी सोडण्याच्या या निर्णयामुळे वेदगंगा परिसरातील शेती पाणीपुरवठय़ाचा प्रश्न निकालात निघणार आहेच शिवाय अनेक गावातील पिण्याच्या पाण्याची समस्याही मार्गी लागणार आहे. पाणीपुरवठय़ाबाबत असेच नियोजन येत्या दोन महिन्यातही कायम रहावी, असे मत शेतकरीवर्गातून व्यक्त होत असून समाधान व्यक्त होत आहे.