|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » काँग्रेस, राष्ट्रवादीचा स्वाभिमानीला ‘दे धक्का’काँग्रेस, राष्ट्रवादीचा स्वाभिमानीला ‘दे धक्का’ 

रविंद्र केसरकर/ कुरूंदवाड

कोल्हापूर जिह्यातील बहुचर्चित अशा आलास जिल्हा परिषद मतदार संघात नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा एकोपा तसेच नेत्यावरील विश्वास यामुळे येथे खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीला धक्का देत, स्वाभिमानीकडील हा गड दोन्ही काँगेसने परत मिळविला.

यापूर्वी या जिल्हा परिषद मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या माजी खासदार श्रीमती निवेदिता माने पुत्र धैर्यशील माने यांनी थेट जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपर्यंत मजल मारली होती. मात्र यानंतरच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी मधील काही प्रमाणात झालेला निसंवाद, नेत्यांची हट्टाची भूमिका यामुळे याचा फायदा बरोबर उठवत खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानीने येथे पाय रोवत परंपरागत काँग्रेस व राष्ट्रवादीकडे असणारा हा गड काबिज करत या मतदार संघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. या जोरावर स्वाभिमानी जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस सोबत सत्तेत विराजमान झाली, याचा फायदा शिरोळ तालुक्यात स्वाभिमानीला फारसा उठवता आला नाही. तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकी पुरते पानीपत झालो. त्याला आलास मतदार संघही अपवाद राहिला नाही. मागील वेळी निसटता का होईना विजय मिळवत काँग्रेसचा बालेकिल्ला उद्धवस्त करणाऱया स्वाभिमानीला यावेळी येथील आपले वर्चस्व राखता आले नाही. शिवाय नुकत्याच झालेल्या शिरोळ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीत तालुक्याचे शिवसेनेचे आमदार उल्हास पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानूसार काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जात सेनेकडे उपसभापतीपद पदरात पाडून घेतले. शिवाय सत्ताधारी स्वाभिमानीला विरोधी बाकावर बसणे भाग पाडून स्वाभिमानीला चांगलेच बॅन फुटवर आणले. याचा परिणाम गणेशवाडी मतदार संघातील काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य मल्लाप्पा चौगुले यांना सभापती पदाची संधी मिळाल्याने स्वाभिमानीला या मतदार संघात पुन्हा धक्का बसला.

दरम्यान यावेळच्या निवडणुकीत काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नेते उद्यानपंडित गणपतराव पाटील, शरद कारखान्याचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांची चांगलीच मोट बांधत स्वाभिमानीला तसेच सेना-भाजपाला शिकस्त देण्याची रणनीती आखली, त्यात कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलीच साथ दिली. या साथीला या मतदार संघातील सुज्ञ मतदारांची साथ मिळाल्याने येथे पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व सिद्ध करता आले.

काँग्रेस-राष्ट्रवादीने येथे उमेदवार निवडीपासून योग्य पावले उचलली, यासाठी या मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांचे म्हणणे गणपतराव पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी ऐकून घेत योग्य निर्णय घेतला. यामुळे आलास जिल्हा परिषदसाठी राष्ट्रवादीच्या सौ. परवीन दादेपाशा पटेल या विजयी झाल्या. हिच स्थिती आलास पंचायत समिती मतदार संघात राहिली आणि येथे राष्ट्रवादीच्या सौ. रूपाली महावीर मगदूम या विजयी झाल्या. तर गणेशवाडी मतदार संघात हा मतदार संघ खुला असल्याने अनेकजण इच्छुक होते, पण येथील काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रसंगी नेत्यांची वारोंवार भेट घेत, येथे काँग्रेस तसेच दीवंगत माजी आमदार सा. रे. पाटील यांचे खास कार्यकर्ते मल्लाप्पा चौगुले यांनाच तिकीट द्या, अशी मागणी लावून धरली. याबाबत तालुका काँग्रेसमधील काहीजण नाखुश होते, पण बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे चौगुले यांना उमेदवारी दिली आणि ते विजयी झाले. पुन्हा नदीपलिकडील सात गावातील सामान्य कार्यकर्त्याला सभापती पदापर्यंत मजल मारता आली.

या निवडणुकीत उमेदवार निवडीपासून स्वाभिमानी आणि सेना, भाजप यांच्यात थोडी विसंगती दिसून आली. कार्यकर्ते कमी पडले, स्वाभिमानीची नेहमीची रणनीती येथे कामी आली नाही, तर सेना, भाजपाने येथे पणाला लावलेली प्रतिष्ठा कमी पडली. काही प्रमाणात बंडखोरीचा फटका बसला आणि स्वाभिमानीबरोबर सेना-भाजपाला येथे पराभव पत्करावा लागला. काँग्रेस-राष्ट्रवादीने येथे स्वाभिमानीबरोबर सेना-भाजपाला शिकस्त देत स्वाभिमानीकडील हा बालेकिल्ला आपल्याकडे खेचून आणत, स्वाभिमानीला चांगलाच धक्का दिला.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!