|Friday, July 28, 2017
You are here: Home » आवृत्ती » सातारा » नुसताच काथ्याकुट; आज होणार निवडनुसताच काथ्याकुट; आज होणार निवड 

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड मंगळवारी होत आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सदस्यांची महत्वाची बैठक विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाची मागणी संजीवराजे नाईक- निंबाळकर, वसंतराव मानकुमरे आणि मानसिंगराव जगदाळे यांनी तर उपाध्यक्षपदासाठी राजेश पवार व सुरेंद्र गुदगे यांनी जोरदार केली. मात्र, अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची नावे पक्षश्रेष्ठीकडून सकाळी 9 वाजता समजतील असे राष्ट्रवादीच्या जिल्हा नेत्यांनी सांगितल्याने सोमवारी दिवसभर नुसताच काथ्याकुट झाला. यामुळे अध्यक्षपदाचा सस्पेन्स कायम राहिला आहे. त्यामुळे यावेळीही जिल्हय़ातील अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा निर्णय लखोटय़ातून समजणार असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर नियोजित वेळेत बैठक सुरु झाली. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रराजे भोसले, नरेंद्र पाटील, माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर, बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित सर्वच सदस्यांची मते जाणून घेतली. अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार हे संजीवराजे नाईक- निंबाळकर यांनाच मानले जात आहे. परंतु वसंतराव मानकुमरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनीही अध्यक्षपदाची जोरदार मागणी केली. वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असलेले इच्छुक मानसिंगराव जगदाळे हेही कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासोबतच अध्यक्षांच्या बंगल्यामध्ये आले. कमराबंद बैठक संपल्यानंतर मात्र संजीवराजे यांच्या चेहऱयावर हास्य दिसत होते. इतरांचे चेहरे पडले होते.

नेत्यांनीही प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलतानाही जाहीरपणे अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणाला देण्यात येणार हे टाळले. मात्र, त्यांच्याकडून मागणी होत असलेल्या नावांवर रात्री आमदारांची बैठक होणार असून त्याबाबत पक्षश्रेष्ठींना त्या चर्चेचा सार सांगण्यात येणार आहे. श्रेष्ठींकडून सकाळी 9 वाजता दोनच नावे येणार आहेत. त्यामुळे बारामतीमधून येणाऱया लखोटय़ानुसार सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष ठरणार आहे. चारित्र्यसंपन्न या शब्दावर काही नेते मंडळीकडून जोर दिला जात होता. त्यामुळे अध्यक्षपद हे फलटणला आणि उपाध्यक्षपद पाटणला मिळण्याची शक्यता व्यक्त होत होती. दरम्यान, विषय समितींच्या सभापतींची निवडी दि. 4 एप्रिल रोजी होणार आहेत. त्या अनुषंगाने अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!