|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नीलेश राणे यांचा काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा

नीलेश राणे यांचा काँग्रेस सरचिटणीसपदाचा राजीनामा 

प्रतिनिधी / रत्नागिरी

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून तोफ डागत माजी खासदार निलेश राणे यांनी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष पद सुमारे दोन वर्षे रिक्त आहे. या बाबत चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करूनही कोणतीच कार्यवाही झाली नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत राणे यांनी नेतृत्वावर टीकास्र सोडले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या पक्षातराबाबतची चर्चा, त्याला स्वतः राणे यांनी दिलेला पुर्णविराम या सर्व घडामोडींच्या पार्श्वभुमीवर निलेश राणे यांनी घेतलेल्या आक्रमक भुमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, निलेश राणेंच्या भूमिकेला जिल्हय़ातील बहुतांश पदाधिकाऱयांनी पाठींबा देत सामुहिक राजीनामास्राचा इशारा दिला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी पदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचा रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद दिड वर्षांपासून रिक्त आहे. जिल्हाध्यक्षांविनाच नगर परिषद व जि.प.., प. स निवडणुकीला पक्ष सामोरा गेला. पाच तालुक्यांमध्ये राणे यांनी तर चार तालुक्यांमध्ये भाई जगताप यांनी उमेदवार निवडीसह सर्व प्रकिया पार पाडल्या होत्या. या सर्व पार्श्वभुमीवर जिल्हाध्यक्ष निवडीबाबत दिरंगाई करणाऱया प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्यावर राणे यांनी तोफ डागली आहे.

पक्षाचा जिल्हाध्यक्ष नेमू न शकणाऱया पक्षाला मतदान का करायचे असा सवाल मतदार करत होते. या दिरंगाईमुळेच पक्षाला पराभवला सामोरे जावे लागल्याचे नमूद करत राणे यांनी नेतृत्वावर टीकास्र सोडले आहे. आपल्याकडे दीड वर्ष पाठपुरावा करूनही हा विषय आपण गांभीर्यानें घेतला नाही. त्यामुळे आपल्यासोबत यापुढे काम करणे जमणार नाही असे राणे यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे. मंगळवारी त्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे राजीनामा सादर केला.

दरम्यान निलेश राणे यांच्या राजीनाम्याचे तीव्र पडसाद रत्नागिरी जिल्हय़ात उमटू लागले आहेत. चिपळूण, राजापूर, रत्नागिरी येथील कार्यकारिणीने राणे यांचे समर्थन केले आहे. बुधवारी दुपारी 12 वाजेपर्यंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत प्रदेश स्तरावरून योग्य ती कार्यवाही न झाल्यास तालुका, महिला आणि युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व सदस्य राजीनामा सामुहिक राजीनामे देतील असा इशारा देण्यात आला आहे. राजापुर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुका युवक अध्यक्ष समीर खानविलकर व जिल्हा सरचिटणीस जयवंत दुधवडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत नीलेश राणे यांच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी युवकचे अरविंद लांजेकर, मुकेश जाधव आदी उपस्थित होते.

चिपळुणात नीलेश राणेंच्या भूमिकेला पाठिंबा

चिपळुणातील पदाधिकाऱयांनीही राणे यांच्या पाठीशी राहत राजीनामे देत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचा निषेध केला आहे. चिपळूण कॉंग्रेस शहराध्यक्ष परिमल भोसले यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

या संदर्भात जिल्हा सचिव मंगेश शिंदे, तालुका सरचिटणीस कबीर काद्री, तालुका सचिव राजेश वाजे, युवक काँग्रेस विधानसभा क्षेत्राध्यक्ष गुलजार कुरवले, युवक तालुकाध्यक्ष अजय साळवी, तालुका सरचिटणीस अन्वर जबले, शहर सचिव हारूण घारे, युवक शहराध्यक्ष प्रफुल्ल पिसे, काँग्रेस आघाडी महिला प्रदेश सरचिटणीस मेघना शिंदे, शहर सचिव संजीवनी शिगवण, उपाध्यक्ष सफा गोठे आदींनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात गेल्या अडीच वर्षात जिल्हाध्यक्षपदाची निवड झाली नाही. त्यामुळे तालुकाध्यक्ष निवडले गेले नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षीय संघटनेला बळ न देता प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी जिल्हय़ाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राणे यांच्या मताशी आपण सहमत असून ते जे भूमिका घेतील त्याला आपला पाठिंबा असल्याने आपण पदांचे राजीनामे देत असल्याचे म्हटले आहे.

 

Related posts: