|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » गृहकर्जधारकांसाठी खूषखबर

गृहकर्जधारकांसाठी खूषखबर 

मासिक हप्त्यात होणार दोन हजार रुपयांनी घट : केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी निर्णय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘प्रधानमंत्री आवास योजनें’तर्गत मोदी सरकारकडून मध्यमवर्गीयांसाठी विशेष अनुदान योजना दाखल करण्यात आली आहे. गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली. या योजनेंतर्गत पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱयांना 6 लाखापर्यंतच्या गृहकर्जावर 3 ते 6.5 टक्के अनुदान प्राप्त होणार असून, यामुळे मासिक हप्त्यामध्ये (ईएमआय) दोन हजार रुपयांची घट होणार आहे. मध्यमवर्गीयांना डोळय़ासमोर ठेवून ही योजना तयार करण्यात आली असून, जानेवारी 2017 नंतर घर खरेदी केलेल्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.

6 ते 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱयांना 90 चौ.मी पर्यंतच्या घरासाठी 9 लाखापर्यंतच्या कर्जावर 4 टक्क्यांनी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान 2 लाख 35 हजार रुपये असणार आहे. तर 12 ते 18 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱयांना 110 चौ.मी पर्यंत घर खरेदी करण्यासाठी 12 लाख रुपयांचे गृहकर्ज दिले जाणार आहे. या कर्जावर 3 टक्क्यांनी अनुदान दिले जाणार आहे. हे अनुदान 2 लाख 30 हजार रुपये असणार आहे. केंद्र सरकारकडून अनुदानाची ही रक्कम गृहकर्ज देणाऱया बँकाना अथवा वित्तीय संस्थांना देण्यात येणार आहे. त्यानंतर सदर बँकेकडून गृहकर्जधारकाच्या मासिक हप्त्यात (ईएमआय) घट करण्यात येणार आहे.

2022 पर्यंत सर्वांना घर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 डिसेंबर रोजी राष्ट्राला संबोधून केलेल्या भाषणामध्ये 2022 पर्यंत सर्व भारतीयांना घर देण्याची घोषणा केली होती. याअंतर्गत केंद्र सरकारने तातडीन पावले उचलत काही प्रभावी योजना तयार केल्या आहेत. या योजनांचा फायदा 18 लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱयांना होणार आहे.

गृहकर्जधारकांना होणार लाभ

जर एखाद्या व्यक्तीने 25 लाखाचे घर खरेदी केले असेल आणि त्यासाठी 20 लाखाचे कर्ज घेतले असले तर त्याला 11 लाखांसाठी पूर्ण व्याज द्यावे लागेल. मात्र, उर्वरित 9 लाखांवरील व्याजदरावर 4 टक्के अनुदान मिळेल. गृह कर्जाचा कालावधी 20 वर्षाचा असल्यास मासिक हप्त्यात 2062 रुपयांनी घट होणार आहे.