|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » काजू बीच्या दरात घसरण

काजू बीच्या दरात घसरण 

कणकवली : आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काजू बीची वाढलेली आवक, जास्त उत्पादन यामुळे काजू बीचा दर कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांत सिंधुदुर्गमधील (कणकवली) दरात सुमारे 10 रुपयांनी घट झाली असून पुढील आठवडय़ात त्यात आणखी घट होण्याची भीती आहे. काजूचे उत्पादन घेणाऱया राष्ट्रांमध्ये आलेले बंपर पीक तसेच सिंधुदुर्गमध्येही गेल्या दोन आठवडय़ात काजूची वाढलेली आवक यामुळे हा दर कोसळत असल्याचे स्थानिक व्यापाऱयांनी सांगितले. दरम्यान, ‘कॅशलेस’ व्यवहारांनंतरही काजू बीच्या खरेदीचा कोटय़वधींचा व्यवहार हा आज जरी रोखीत होत असला, तरीही पुढील टप्प्यात तो ऑनलाईन (थेट बँक खात्यावर) होण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्गमध्ये सुरुवातीला 165 ते 170 रुपये एवढा काजूचा दर काढण्यात आला होता. त्यावेळी काजू बीची आवक फारच कमी होती. मात्र, होळी उत्सवानंतर काजू बीची आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे स्थानिक व्यापारी जगन्नाथ उर्फ बाबू वळंजू यांनी सांगितले.

काजू बीच्या आवकमध्ये झालेली वाढ तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अर्थात बेनीम, व्हीएतनाम, कंबोडिया, आयवरी या देशांमध्ये यावर्षी काजूपिक मोठय़ा प्रमाणात आले आहे. काही लाख टन काजूचे पीक जास्त आले आहे. व्यापारी वर्गाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेनीममध्ये गेल्या दोन दिवसांत काजूचा दर अचानक घटला. देशातील चलनाच्या माध्यमातून विचार केला, तर हा दर सुमारे 14 रुपयांनी कमी झाला. साहजिकच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काजूचा दर कमी झाल्याने मोठय़ा घाऊक मार्केटमध्येही काजूचा दर उतरला. परिणामी 21 मार्च रोजी कणकवलीच्या मार्केटमध्ये काजूचा प्रतिकिलो 150 रुपये असलेला दर गुरुवारी 140 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये काजूच्या दरातील ही घसरण अशीच कायम राहिल्यास पुढील आठवडय़ापर्यंत हा दर आणखीन खाली येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. स्थानिक व्यापाऱयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोवा सोसायटीमार्फत खरेदी होणाऱया काजूच्या दरातही घट करण्यात आली आहे. सिंधुदुर्गमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात जरी चांगला दर मिळाला असला, तरीही काजू कारखाने व होलसेल खरेदीदारांनी खरेदीत जास्त स्वारस्य न दाखविल्यास त्याचा परिणाम थेट काजू दरावर होऊन शेतकऱयांना फटका बसण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

दरम्यान, आपल्याकडे आजही काजूची खरेदी-विक्री ही रोखीत होते. त्यासाठी आठवडा बाजारात, तर कोटय़वधींची उलाढाल होत असते. मात्र, यासाठी मार्केटमध्ये रोखीचा पैसा कमी पडू लागल्याचे दिसत आहे. कारण बँकांकडून मिळणारी रोख रक्कम, कॅशलेस व्यवहारांची सक्ती याबाबतचा गांभीर्याने विचार करता पुढील काही काळात काजू बी विक्रीच्या रकमाही व्यापाऱयांकडून ऑनलाईन पद्धतीने खात्यावर जमा करण्याची पद्धत येण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.