|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » काँग्रेसला जिल्हाध्यक्ष देण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई

काँग्रेसला जिल्हाध्यक्ष देण्यासाठी आता रस्त्यावरची लढाई 

प्रतिनिधी / रत्नागिरी

काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदावर योग्य कार्यकर्त्याची नियुक्ती व्हावी यासाठी प्रसंगी टाळे ठोकणे, रास्ता रोको, टिळकभवनच्या बाहेर उभे राहणे यासह कोणत्याही थराला उतरुन आंदोलन करु अशी आकमक भुमिका माजी खासदार नीलेश राणे यांनी घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना पदावरुन दूर करण्याची मोहीमही तीव्र करणार असून आपला राजीनामा मागे घेण्याच प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत गुरूवारी नीलेश राणे यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. राणेंची कोंडी करण्याच्या हेतूने असले किंवा कोणतातरी रागा मनात धरून असेल पण काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्षपद प्रदेशाध्यक्षांकडून भरले गेलेले नाही. याचा मोठा फटका नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला बसला. प्रदेशाध्यक्षांनी त्यांचे काम योग्य स्वरुपात केले नसल्यानेच पक्षला नुकसान सहन करावे लागले. रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदाची फाईल दिल्लीला पाठवली असल्याचे चव्हाण सांगतात. मात्र ते थोतांड असून कामे अडकवून ठेवण्यासाठी कोणत्याही फाईल ते कोठेही पाठवू शकतात, असा टोला राणे यांनी लगावला.

नीलेश राणे पुढे म्हणाले, अशोक चव्हाण यांच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळेच राज्यात पक्षाला जिल्हा परिषद, पंचायत समिती †िनवडणुकीत मोठा पराभव पत्करावा लागला. त्यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्यानेच मी राजीनामा देवून धाडसाने त्यांना हटवण्याची मागणी पुढे रेटायला सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.

मला काँग्रेस पक्ष सोडायचा नाही. तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष होण्यातही मला कोणतेही स्वारस्य नाही. एखाद्या सक्षम कार्यकर्त्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी. काँग्रेस पक्ष वाढावा यासाठीच आपला लढा आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणूनच मी यापुढे काम करत राहीन व लोकसभा निवडणुकीला पुन्हा हिंमतीने उतरेन, असे राणे यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, नारायण राणे किंवा आम्हा कोणालाही अन्य पक्षात जायचे नाही. गेलो तर गुपचूप जाणार नाही गाजावाजा करुनच जावू. मी प्रदेशाध्यक्षांच्या अकार्यक्षमतेच्या विरोधात प्रदेश सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. तो मागे घेण्याचा प्रश्न नाही. काँग्रेसचा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष नियुक्त केला गेला तरी मी पुन्हा प्रदेश कार्यकारिणीत जाणार नाही. पक्षाचे दुर्दैव आहे की अशोकराव चव्हाण जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेशी आघाडी करायला पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत. असा प्रदेशाध्यक्ष बदललाच पाहिजे, असे ते म्हणाले.

Related posts: