|Thursday, August 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » बिद्रीत पाटील कुटुंबियांनी उभारलेल्या व्यासपीठाचा लोकार्पण सोहळा संपन्न

बिद्रीत पाटील कुटुंबियांनी उभारलेल्या व्यासपीठाचा लोकार्पण सोहळा संपन्न 

प्रतिनिधी/ सरवडे

गावातील लोकांना तसेच विद्यार्थ्यांना विविध सामाजीक कार्यक्रम घेता यावेत. यासाठी बिद्री ता. कागल येथील पांडुरंग संतराम पाटील व कुटुंबियांनी सामाजीक बांधिलकी जोपासत मराठी शाळेच्या प्रांगणात व्यासपीठ बांधले आहे. या व्यासपीठाचा लोकार्पण सोहळा बिद्री साखर कारखान्याचे प्रशासकीय अध्यक्ष अरूण काकडे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील होते.

याप्रसंगी काकडे म्हणाले, पाटील कुटुंबियांनी व्यासपीठ बांधून गावातील लोकांची आदर्शवत सोय केली आहे. आर्या एच.पी. गॅसच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजीक उपक्रम राबविले असून भविष्यात या व्यासपीठाचा उपयोग विद्यार्थी वर्गाला व्हावा यासाठी अध्यापन वर्गाचे आयोजन करावे. बाबासाहेब पाटील म्हणाले, सद्यस्थितीत सामाजीक बांधिलकी दुरावत चालली असताना या पाटील कुटुंबियांनी ती जोपासण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचा लाभ लोकांना होत असून त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी बिद्रीचे संचालक रणजितसिंह पाटील यांचे भाषण झाले. 

स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय पाटील व प्रास्ताविक एम. आर. पत संस्थेच्या सदस्या सविता पाटील यांनी केले. कार्यक्रमास पांडुरंग पाटील, सरपंच विद्या कांबळे, उपसरपंच साजन पाटील, भिकाजी पाटील, भरत पाटील, संदेश पाटील, बाळासो पाटील, शहाजी पाटील आदी उपस्थित होते. आभार संदिप चौगले यांनी मानले.