|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबईत राणीच्या बागेत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष

मुंबईत राणीच्या बागेत पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष 

रविवारी 30 हजार पर्यटकांचे पेंग्विनदर्शन

प्रतिनिधी/ मुंबई

मोफत पेंग्विनदर्शनाचा हा शेवटचा रविवार असल्याने प्रचंड गर्दी पहायला मिळाली. रविवारी जवळपास 30 हजार लोकांनी पेंग्विन दर्शन घेतले असल्याचे राणीबागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी सांगितले. मात्र प्रचंड उन्हाचा तडाखा असल्याने लहानग्यांसह मोठय़ांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल झाल्याचे दिसून आले.

पेंग्विन पाहण्यासाठी रविवारी दिवसभरात मुंबईकरांची झुंबड उडाली होती. यामध्ये दोन वर्षांच्या लहानग्यापासून 75 वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत सर्वांचीच पेंग्विन गर्दी लोटली होती. दुपारी 3 वाजता मुख्यप्रवेशद्वार बंद करण्यात येणार असल्याची, तसेच तिकिटविक्रीदेखील बंद करण्यात येणार असल्याची पूर्वसूचना डॉ. त्रिपाठी यांनी दिली होती; तरीदेखील राणीबागेबाहेर मोठी गर्दी होती. राणीबागेच्या सभोवताली असलेल्या वेगवेगळ्या प्रवेशद्वारातून लोक प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. हम्बोल्ट पेंग्विन कक्षाकडे जाण्यासाठी भली मोठी रांग लावावी लागत होती. मात्र, 53 एकरात वसलेल्या या राणीबागेत फेरफटका मारताना छोटय़ांसह मोठय़ांचीही दमछाक होताना दिसली. दरम्यान, रणरणत्या उन्हामुळे लहानग्यांचे पिण्याच्या पाण्याच्या दुर्भिक्षामुळे हाल झाले.

याबाबत राणीबागेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांना विचारले असता त्यांनी मुख्यद्वाराजवळ, कार्यालयाजवळ आणि पेंग्विन कक्षाबाहेर थंड पाण्याची सोय करण्यात आली आहे. अनेक जुन्या पाणपोया बंद पडल्या असून लवकरच 2 ते 3 महिन्यांत 11 ते 12 ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करणार आहोत, असे सांगितले. त्याचप्रमाणे शौचालय आणि आराम करण्यासाठी निवारा ठिकाणांचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.