|Saturday, April 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » ती संध्या काय करते?

ती संध्या काय करते? 

अनधिकृत कामांबाबत आवाज उठवणाऱयांना का त्रास दिला जातो, त्यांच्या जिवाला कसा धोका असतो, याबद्दल नेहमीच वाचायला मिळत असतं. माहिती अधिकाराचा वापर करून गैरप्रकार उघडकीस आणणारे कार्यकर्ते, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणारे लोक, आपलं कर्तव्य बजावताना कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करणारे सरकारी अधिकारी, कोणत्याही गैरप्रकाराचा पर्दाफाश करून  गुन्हेगारांचा बुरखा समाजासमोर फाडणारे पत्रकार अशा अनेकांच्या कहाण्या प्रसारमाध्यमांनी उघड केल्या आहेत. सत्यनारायण, मंजुनाथ, सतीश शेट्टी किती नाव घ्यावीत, ज्यांनी आपलं काम चोखपणे करताना प्राण गमावले आहेत. आणि एक क्षेत्र नाही, जिथे भ्रष्टाचार नाही, गैरप्रकार घडत नाहीत… तेल किंवा अन्न भेसळ असो वा दूध भेसळ, वजनातली चोरी असो वा एफएसआयमधली, त्याबद्दल चौकस असणाऱयांना नेहमीच त्रास दिला जातो. चेन्नईस्थित पत्रकार संध्या रविशंकर ही अशा त्रासाची बळी ठरू पाहतेय. तिचा दोष इतकाच की तिने तामिळनाडूतील वाळू माफियाची काळी कृत्यं उघडकीस आणली…

संध्या सध्या ‘द वायर’ या वेबसाईटसाठी काम करते. त्यावर तिने अलीकडेच जानेवारी महिन्यात दिलेल्या वाळू माफियांविरुद्धच्या लेखमालिकेमुळे ज्यांची कीर्ती, नाव आणि व्यवसाय अडचणीत आला आहे, त्यांनी संध्याला त्रास देण्यास सुरुवात केली. ए. वैकुंठराजन या उद्योगपतीच्या माणसांनी आपल्याला त्रास देण्यास सुरुवात केली असल्याचा आरोपच संध्याने आपल्या लिखाणाद्वारे केला आहे. तिला इंटरनेटवरून सतत सतावलं जात आहे. ट्विटर, फेसबुकसारख्या समाज माध्यमांवरूनही तिच्या विरुद्ध व वैकुंठराजन यांच्या बाजूने लिहिलं जात आहे. वैकुंठराजन हे एक टॉपचे किनारी वाळूचे व्यावसायिक असून, देशभर त्यांचं वाळू उत्खननाचं काम चालतं. संध्याला त्रास देण्याचे अनेक प्रकार घडले व घडत आहेत. मध्यंतरी तिचा मोबाईल नंबर जाहीरपणे प्रसिद्ध करून, ‘ही महिला जलीकट्टूच्या विरोधात आहे’, ‘तिला फोन करू नका’ असं त्याखाली तामिळमधून लिहिलं होतं. त्यानंतर संध्याला हजारांनी फोन व मेसेज आले, ज्यांनी तिला धमक्मया देण्यापासून, तिला शिवीगाळ करण्यापर्यंत अनेक गोष्टी होत्या. तिच्या गुप्तांगात मिर्ची पावडर टाकली जाईल, तिला मारहाण केली जाईल, अशा विविध तऱहेच्या गोष्टी या धमक्मयांमध्ये होत्या. सर्वप्रकारे तिला घाबरवून सोडण्याचे प्रयत्न केले गेले. वैकुंठराजन यांच्यावतीने संध्याविरुद्ध अब्रू नुकसानीची पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली. संध्यानेही आपला मोबाईल नंबर इंटरनेटवर प्रसिद्ध केल्याबद्दल पोलिसात तक्रार नोंदवली. यापूर्वी ‘विकटन’ मासिक व ‘द हिंदू’ अशा मान्यवर प्रकाशनांनाही वाळू माफियांचा रोष पत्करावा लागला आहे.

संध्या तशी तर गेल्या चार वर्षांपासून ती वाळू माफियाबाबत बातम्या व वार्तापत्रं देते आहे. आणि संबंधित लोक तिच्या मागे हात धुवून लागली आहेत. याआधी ती टाइम्स समूहात होती. त्यावेळी उत्तर प्रदेशातील आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल हिने तेथील वाळू माफियांवर कारवाई केल्यामुळे तिला झालेल्या त्रासाची व तिच्या बदलीची बातमी गाजत होती. ती प्रसिद्ध होताच संध्या रविशंकरला तामिळनाडूत तुतिकोरिन इथे अशाच तऱहेची कारवाई होणार असल्याची खबर मिळाली. तिचा पाठपुरावा घेतल्यावर संबंधित अधिकाऱयाचीही बदली करण्यात आल्याचं संध्याला समजलं. मग तीही बातमी लावून धरण्यात आली आणि ‘टाइम्स नाऊ’ या चॅनेलनेही ती ठळकपणे दाखवली. संध्या धडाडीने आपलं काम करत आली आहे. पण तिच्या मागे खोटय़ा आरोपांचा व तक्रारींचा लकडा लावून, तिला त्रास दिला जात आहे. ती आपला प्रतिस्पर्धी असलेल्या वाळू व्यावसायिकेची सुपारी घेऊन या बातम्या देते, तिच्या नवऱयाला वैकुंठराजनच्या मीडिया कंपनीत नोकरी मिळाली नाही, म्हणून ती हे सारं सूडापोटी करते असे खोटे आरोपही संध्यावर करण्यात आले.

या तऱहेचे सतावणुकीचे प्रकार चालूच राहिले, तर पत्रकारांना काम करणंच मुश्कील होऊन बसेल. आजकाल फेसबुक, ट्विटर व व्हॉट्सऍप यासारख्या माध्यमांमुळे कोणीही कोणावर काहीही लिहू शकतो वा आरोप करू शकतो. जे चटकन जगासमोर येतात आणि संबंधित व्यक्तीला खूप त्रास होऊ शकतो. भ्रष्टाचार, वाळू माफियासारखे गैरप्रकार अशा सामाजिक व सार्वजनिक हिताला अपाय पोहोचवणाऱया बाबी पडद्यातच राहव्यात, असा हेतू बाळगून, ट्रोलिंग करून पत्रकार व कार्यकर्त्यांना सतावले जाते. त्यांच्यावर नाही नाही ते आरोप ठेवले जातात. संध्याबाबत होत असलेल्या या धमक्मयांचा निषेधच व्हायला हवा. तामिळनाडूतील व देशभरातील पत्रकार व कलाकार मंडळी संध्याच्या बाजूने उभी राहिलीच आहेत. संध्याला धमकावणाऱयांना तसंच सोडून न देता, या प्रकारांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी रास्त मागणीच या लोकांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय व हर्ष मंदर यांच्यापासून अनेक जणांनी संध्याला पाठिंबा दिला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येणारे हे प्रकार रोखले जायलाच हवेत. मॅगसेस पुरस्कार विजेते  प्रसिद्ध टी.एम. कृष्णा यांनीही संध्याला पाठिंबा देताना म्हटलं आहे की, ‘आमचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवन नियंत्रित करू पाहणाऱया वेगवेगळय़ा गुंडांपासून स्वातंत्र्य मिळवण्याची संधीच तिने आम्हाला दिली आहे.’

संध्यासारख्या व्यक्ती आपलं काम चोखपणे करून, समाजाला हानी पोहोचू नये, यासाठी झटत असतात. गैरप्रकारांविरुद्ध निडरपणे उभी राहणारी ही माणसं इतरांनाही दहशतमुक्त राहण्याचा संदेश देत असतात. म्हणूनच संध्याला पाठिंबा देणाऱयांची संख्या वाढायला हवी. संध्या एक स्त्री आहे आणि तिला एक स्त्री म्हणूनही अपमानित करण्याचे प्रकार घडले आहेत. अशा ‘जेंडर-बायस्ड’ धमक्मयांचा आणि दहशतीचा तर तीव्र निषेध झाला पाहिजे. देशातील 50 मान्यवर महिला पत्रकारांनी तामिळनाडू सरकारला पत्र लिहून, यासंदर्भातील आपला निषेध व्यक्तही केला. तामिळनाडू सरकारने हस्तक्षेप करून, संध्या रविशंकरला होणाऱया त्रासाची दखल घ्यावी व त्यास आळा घालावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली. त्याची दखल घेऊन, संध्या रविशंकरबद्दल पसरवल्या जाणाऱया अफवांवर विश्वास ठेवू नये, अशी जाहीर सूचनाच गेल्या शनिवारी 25 मार्चला तिरुनेरवेलीच्या कलेक्टरने काढली. वाळूसारखी नैसर्गिक साधनसंपत्ती गैरप्रकारे हाताळली जात असेल, तर तो मोठाच गुन्हा आहे. त्याबद्दल संबंधितांना शिक्षा होणं हे महत्वाचं ठरेल. पैसा व सत्तेच्या जोरावर पण काहीही करू शकतो, हा जो विश्वास इथल्या शक्तिमान लोकांमध्ये आहे, तो ठेचला जायला हवा. संध्या आपलं काम करत असताना, तिलाच धमक्मयांना सामोरं जावं लागत आहे, हे कशाचं लक्षण आहे? दुसरीकडे सोशल मीडिया आणि तंत्रज्ञान आपल्या बाजूने राबवण्याची चलाखी आज दाखवली जाते. सोशल मीडियाचा असा गैरवापर वाढत आहे, ही सुद्धा विशेष चिंतेची बाब आहे.

Related posts: