|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » क्रिडा » देवधर करंडक तामिळनाडूकडे

देवधर करंडक तामिळनाडूकडे 

वृत्तसंस्था/ विशाखापट्टणम

दिनेश कार्तिक (126), नारायण जगदीशन (55) व राहील शाह (3/40) यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने अंतिम लढतीत भारत ब संघावर 42 धावांनी विजय मिळवताना देवधर करंडकावर नाव कोरले. तामिळनाडूने विजयासाठी ठेवलेल्या 304 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारत ब संघाचा डाव 46.1 षटकांत 261 धावांवर आटोपला. विशेष म्हणजे, अवघ्या दहा दिवसापूर्वी तामिळनाडूने विजय हजारे चषक जिंकला होता. अंतिम लढतीत शतकी खेळी साकारणारा दिनेश कार्तिक सामनावीर ठरला.

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱया तामिळनाडूची खराब सुरुवात झाली. सलामीवीर कौशिक गांधी (16), गंगा राजू (13), मुरुगन अश्विन (0) झटपट बाद झाल्याने तामिळनाडू संघ 3 बाद 39 अशा संकटात सापडला होता.  चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या नारायण जगदीशन व दिनेश कार्तिक यांनी चौथ्या गडय़ासाठी 136 धावांची भागीदारी साकारली. शिवाय, संघाला सुस्थितीतही पोहोचवले.

दिनेश कार्तिकने शानदार शतकी खेळी साकारताना अवघ्या 91 चेंडूत 14 चौकार व 3 षटकारासह 126 धावांची खेळी साकारली. जगदीशनने त्याला 55 धावांची खेळी साकारत चांगली साथ दिली. जगदीशन बाद झाल्यानंतर विजय शंकर (21), बाबा इंद्रजीत (नाबाद 31) यांनी कार्तिकला चांगली साथ दिली. यामुळे, तामिळनाडूला 50 षटकांत 9 बाद 303 धावापर्यंत मजल मारता आली. भारत ब संघातर्फे धवल कुलकर्णीने 39 धावांत 5 गडी बाद केले.

प्रत्युतरादाखल खेळणाऱया पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील भारत ब संघाला विजयी आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 46.1 षटकांत 261 धावांवर संपुष्टात आला. गुरकिरत सिंग (64), शिखर धवन (45) वगळता इतर फलंदाजानी साफ निराशा केल्यामुळे भारत ब संघाला विजयापासून वंचित रहावे लागले. कर्णधार पार्थिव पटेल (15), मनीष पांडे (32), इशांक जग्गी (1) यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. हरप्रीत सिंगने 36 धावांचे योगदान दिले. गुरकीरत सिंगने 85 चेंडूत 7 चौकारासह 64 धावा फटकावल्या. मात्र, राहील शाहने त्याचा अडथळा दूर केला. तो बाद झाल्यानंतर भारत ब संघाचा डाव 46. 1 षटकांत 261 धावांवर आटोपला. तामिळनाडूतर्फे राहील शाहने 3, बी साई किशोर व एम. मोहम्मद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : तामिळनाडू 50 षटकांत 9 बाद 303 (नारायण जगदीशन 55, दिनेश कार्तिक 126, बाबा इंद्रजीत नाबाद 31, धवल कुलकर्णी 5/39, अशोक दिंडा 1/54), भारत ब 46.1 षटकांत सर्वबाद 261 (गुरकीरत सिंग 64, शिखर धवन 45, हरप्रीत सिंग 36, मनीष पांडे 32, राहील शाह 3/40, बी साई किशोर 2/41).