|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » साताऱयासह माणदेशात अवकाळीचा तडाखा

साताऱयासह माणदेशात अवकाळीचा तडाखा 

प्रतिनिधी/ सातारा

गेल्या दोन दिवसांपासून जिह्यातील वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून तापमानाने चाळीशी गाठली होती. उकाडाही वाढला होता. मात्र, दोन दिवसांपासून सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होत होते. शुक्रवारी सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाने सुरुवात केली. सातारा तालुक्यातील काही गावांमध्ये पाऊस झाला असून शहरामध्ये तब्बल एक तासभर पाऊस पडल्याने हवेत गारवा निर्माण झाला. सातारा जिह्यात खटाव तालुक्यातील औंध परिसर, कोरेगाव तालुक्यातील ल्हासुर्णे, शिरढोण, त्रिपुटी तर पाटण तालुक्यात तारळे परिसरात पाऊस झाला. या आवकाळी पावसामुळे काही प्रमाणात उन्हाळी पिकांना फटका बसला. पाऊस सुरू होण्यापूर्वी काही काळ जोराचा वारा सुटला हेता. त्यादरम्यान विज पुरवठा खंडित करण्यात झाला होता.

गेल्या दोन दिवसापासून सातारा जिह्यातील सर्वच तालुक्यातील तापमानाने कमालीची मर्यादा ओलांडली. तब्बल 40 अंशापर्यंत वातावरण गेले होते. गुरुवारी दुपारी वातावरण बदलले. वारा वाहू लागला. महाबळेश्वरमध्ये धुके लोटले होते. दुसऱया दिवशी शुक्रवारी वातावरणात कमालीचा उकाडा जाणवू लागला. दुपारनंतर वातावरणात बदल झाला. शहरात सायंकाळी पाचनंतर मेघगर्जनेसह गोडोली, कोडोली, समर्थमंदिर, केसरकर पेठ, मंगळवार पेठ, यादोगोपाळ पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ या भागात पाऊसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पाऊस झाल्याने काहींनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला तर काहींची पळापळ झाली. आलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला. कोरेगाव तालुक्यातील कलेढोण, ल्हासुर्णे, त्रिपुटी या परिसरामध्येच सुमारे पाऊण तास पाऊस सुरु होता. यामुळे शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाटण तालुक्यातील तारळे परिसरात केळेवाडी वरची, खालची, गर्जेवाडी, कडवे बुद्रुक, कडवे खुर्द या गावामध्ये पाऊस झाला.

उर्वरित सातारा, फलटण, कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कराड, जावळी, पाटण तालुक्यांमध्ये मात्र सलग चौथ्या दिवशीही सूर्य आग ओकत होता. सरासरी 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, त्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी तीनच्या सुमारास काळे ढग जमा झाले होते. सातारा शहरात सलग दुस्रया दिवशीही दुपारी रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. घरोघरी व शासकीय कार्यालयांमध्ये पंखे, वातानुकूलित यंत्रणा, कुलर यांचाच आधार घ्यावा लागत आहे.

नागठाणे :

गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाडय़ाने हैराण झालेल्या येथील जनतेला शुक्रवारी संध्याकाळी अचानक पडलेल्या वळीवाच्या पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला.शुक्रवारी संध्याकाळी नागठाणे परिसरातील गावांमधून जोरदार वायासह वळीवाच्या पावसाने अल्पशी हजेरी लावली.

 गेल्या काही दिवसांपासून नागठाणे परिसरातील गावांमधील जनता उकाडय़ाने हैराण झाली होती.भर दुपारी येथील तापमान सुमारे 37? पर्यंत पोहचत असल्याने लोक घराबाहेर पडनेही टाळत होते.त्यातच सुगीचे दिवस असल्याने येथील शेतकरी सकाळी लवकरच कामाची जुप्पी करत होता.

दोन-तीन दिवसांपासून येथे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने वळीवाच्या पावसाचे आगमन होईल असे वाटत असतानाच पावसाने हुलकावणी दिली होती.मात्र,शुक्रवारी सायंकाळी नागठाणेसह,अंगापुर,वर्णे,सासपडे,पाडळी, मांडवे,कोपर्डे,वेनेगाव,कामेरी,अपशिंगे,माजगाव,खोजेवाडी व परिसरातील गावांमधून जोरदार वारे सुटून वळीवाच्या पावसाचे वातावरण झाले.काही वेळातच या परिसरात वळीवाच्या पावसाने आपली हजेरीही लावली.मात्र, काही वेळच या परिसरात पाऊस झाला, या पावसाने एकीकडे जनता सुखावली असली तरी शेतकरी वर्गाची चांगलीच दमछाक झाली. सुगीचे दिवस असल्याने शेतात काढून ठेवलेल्या रब्बी ज्वारी,गहू व हरभरा या पिकांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली.

खटावमध्ये पाऊसाच्या हलक्या सरी

खटाव  : गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे हैराण झालेल्या खटाव ग्रामस्थांना शुक्रवारी सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसाने दिलासा मिळाला. दुपारी तीनपासूनच काळ्या ढगांनी आभाळ भरून येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवेत अधिकच उष्मा जाणवत होता. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटामध्ये पावसाला सुरुवात झाली. सुमारे पाऊण तास पडलेल्या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी साठले होते.

दिवसभर उकाडय़ामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांना या पावसाच्या सरींमुळे दिलासा मिळाला. तर उन्हाळ्यात पडलेला पाहिलाच पाऊस असल्याने लहान मुले व तरुणांनी पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. खटाव तालुक्यातील वर्धनगडपासून पुसेगाव परिसरात काही प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या. बुधलाही ढगाळ वातावरण तयार होऊन अधूनमधून थेंब पडत होते. त्यामुळे पावसाची चिन्हे निर्माण झाली होती.

अंभेरीत शेतात पाणी; ओढे, नाले तुडुंब

चौकीचा आंबा परिसरातील अंबेरी येथे सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतात पाणी साठले होते. तर ओढे, नाले तुडुंब भरून वाहत होते. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने शेतकयांची पळापळ झाली.

Related posts: