|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अतिरेक्यांच्या हल्ल्यात बैलूरचा जवान शहीद

अतिरेक्यांच्या हल्ल्यात बैलूरचा जवान शहीद 

प्रतिनिधी/ खानापूर

काश्मीरजवळील फंटा येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान शहीद झाल्याची घटना सोमवारी घडली. सदर जवानाचे नाव बसाप्पा फकिराप्पा बजंत्री (वय 43, रा. बैलूर. ता. बैलहोंगल) असे असून तो गेली 22 वर्षे केंद्रीय राखीव दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून सेवा बजावत होता.

काश्मीरजवळील फंटा येथे सुरू असलेल्या पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे सहा जवान जीपमधून बंदोबस्तासाठी फिरत होते. त्यावेळी दि. 1 एप्रिल रोजी त्यांच्या जीपवर अतिरेक्यांनी हल्ला केला. त्यामध्ये बसाप्पा बजंत्रीसह सहाही जवान गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी श्रीनगर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यापैकी बसप्पा बजंत्री याला सोमवार दि. 3 रोजी वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

तो दोन महिन्यापूर्वीच एक महिन्याच्या सुटीवर बैलूर येथे आपल्या गावी आला होता. तसेच तो पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार होता. त्याचे पार्थिव मंगळवारी रात्री दिल्लीहून गोवा येथे आणण्यात आले. गोव्याहून रात्री उशिरा जांबोटी, खानापूर, बिडीमार्गे बैलूर येथे आणण्यात आले.

अंत्यविधी बुधवारी सकाळी बैलूर येथे शासकीय इतमामात होणार आहे.