|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दलाई लामांनी दिली अरूणाचलला भेट

दलाई लामांनी दिली अरूणाचलला भेट 

बोमडिला / वृत्तसंस्था

बौद्धधर्मियांचे धर्मगुरू दलाई लामा यांनी पूर्वनिर्धारित कार्यक्रमानुसार भारताचा प्रांत अरूणाचल प्रदेशला भेट दिली आहे. या भेटीत त्यांनी भारताबद्दल प्रशंसोद्गार काढले असून भारताने माझा चीनविरूद्ध कधीही उपयोग केला नसल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. त्यांच्या भेटीमुळे चीन संतप्त झाला असून भारताला धडा शिकविण्याची दर्पोक्तीयुक्त भाषा त्याने सुरू केली आहे. भारताने मात्र ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्ट करत चीनचा राग अनाठायी असल्याची टिप्पणी केली आहे.

राज्यातील बोमडिला येथे जगभरातून आलेल्या बौद्ध लामांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यात सहभागी होण्यासाठी दलाई लामा मंगळवारी रात्रीच पोहचले होते. बुधवारी त्यांनी कार्यक्रमात भाग घेतला. उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांचे राज्यात तीन दिवस वास्तव्य असून ते येथे असणाऱया जगातील दुसऱया क्रमांकांच्या सर्वात महत्वाच्या बौद्ध मंदिरालाही भेट देणार आहेत.

लामा मूळचे तिबेटचे असून चीनने तिबेटचा कब्जा केल्यानंतर त्यांना तेथून बाहेर पडावे लागले. भारताने त्यांना राजाश्रय दिला. हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे ते तिबेटचे परागंदा सरकारही चालवत असत. तिबेट हा चीनचा कधीच भाग नव्हता, असे त्यांचे म्हणणे आहे.

उलट चीन अरूणाचल प्रदेशच्या तावांग प्रदेशाला आपला भाग मानत आहे. त्यामुळे भारताच्या अनुमतीने कोणताही विदेशी नेता या राज्याला भेट देण्यासाठी आल्यास चीन त्याविरोधात प्रतिक्रिया व्यक्त करतो. यावेळीही लामा यांच्या भेटीविरोधात चीनने संताप व्यक्त केला असून भारताविरूद्ध कारवाई करण्याची धमकी त्याने दिली आहे.

चीनच्या उलटय़ा…

चीनची विस्तारवादी भूक अद्याप शांत झालेली नसून तिबेटचा कब्जा मिळवूनही त्याचे समाधान झालेले नाही. त्याचा डोळा भारताच्या अरूणाचल प्रदेशवर आहे. दलाई लामांच्या निमित्ताने भारतावर दबाव आणण्याचा त्याचा प्रयत्न आहे. तथापि, भारताने यावेळी त्याला दाद दिलेली नाही.