|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » उन्हाबरोबरच आता चलनाच्याही झळा

उन्हाबरोबरच आता चलनाच्याही झळा 

प्रतिनिधी / बेळगाव

शहराचे तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले असल्याने शहरवासियांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. अशातच आता एटीएमधून पैसे मिळविण्यासाठी वणवण करावी लागत आहे. शहरातील निम्म्याहून अधिक एटीएम बंद अवस्थेत आहेत. तर अधिकतर एटीएममध्ये खडखडाट जाणवत आहे. एटीएम बंद असल्याने बॅंकांमधील गर्दीमध्ये वाढ झाली आहे.

चलन मिळण्याचे प्रमुख साधन म्हणून एटीएमकडे पाहण्यात येते. शहरामध्ये अनेक सरकारी, खासगी तसेच सहकारी बँकांची शेकडो एटीएम आहेत. परंतु सध्या पुन्हा एकदा चलन तुटवडय़ाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ही परिस्थिती असेल तर उपनगरांमध्ये काय अवस्था असेल, याची कल्पना न केलेलीच बरी.

एटीएमच्या बाहेर नो कॅशचे बोर्ड झळकत आहेत. तर काही एटीएम चक्क शटर बंद करून ठेवण्यात आली आहेत. काही सुरू आहेत परंतु ती सर्व्हर डाऊनमुळे निरुपयोगी ठरत आहेत. त्यामुळे ऊन्हाच्या झळांबरोबरच आता शहरवासियांना चलन तुटवडय़ाच्या झळाही सहन कराव्या लागत आहेत.

शहर तसेच उपनगरांमध्ये सध्या 150 च्यावर एटीएम आहेत. त्यातील सर्वांधिक 70 एटीएम ही स्टेट बँक ऑफ इंडियाची आहेत. परंतु सध्या 70 ते 80 एटीएम सुरू आहेत. या संदर्भात बँक अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी नाव न घालण्याच्या अटीवर माहिती दिली की, एटीएममध्ये पैसे घालणाऱया एजन्सीलाच पैसे कमी मिळत असल्याने एटीएममध्ये पैसे कमी प्रमाणात घातले जात आहेत. तर जी एटीएम सुरू आहेत त्यांच्यावर अधिक भार पडत असल्याने सर्व्हर डाऊन होत असल्याची माहिती त्यांनी दिली.

एटीएम बंदचा फटका लग्नसराईलाही

सध्या लग्नसराईचे तसेच जत्रांचे दिवस असल्याने खरेदीसाठी नागरिक शहरामध्ये येत आहेत. एटीएममधून पैसे येत नसल्याने त्यांना हताशपणे परतावे लागत आहे. त्यामुळे एक तर बँक गाठावी लागत आहे नाही तर दुसरे एटीएम शोधण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

बँकांमध्ये गर्दी वाढली

एटीएम बंदमुळे पैसे मिळविण्यासाठी नागरिकांना थेट बँका गाठाव्या लागत आहेत. यामुळे नोटाबंदीच्या काळात गजबजलेल्या बँका पुन्हा एकदा गर्दीने गजबजू लागल्या आहेत. यामुळे बॅंक कर्मचाऱयांच्या डोक्मयाचा ताप वाढला आहे.

काही एटीएम शो पुरतीच

असून अडचण नसून खोळंबा अशीच काहीशी परिस्थिती शहरातील एटीएमची पहायला मिळत आहे. नोटांबदीनंतर बंद झालेली एटीएम पाच महिन्यांनंतरही बंदच आहेत. काही एटीएमचा वापर होत नसल्याने अशी एटीएम शो पुरतीच उरली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.