|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » खडकलाट येथे हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना

खडकलाट येथे हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना 

वार्ताहर /खडकलाट :

कै. सदाशिवआण्णा कमते कुस्ती मैदानाजवळ बांधण्यात आलेल्या हनुमान मंदिरात वीर हनुमानाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. तीन दिवस चाललेल्या कार्यक्रमामुळे वातावरण भक्तीमय बनले होते. सायंकाळी 5 वाजता गावातून नूतन मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक मंदिराजवळ आली. रात्री 8 वाजता मूर्ती धान्यात ठेवण्यात आली.

पहाटे 4 वाजता मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यानंतर आडी अप्पन्नावर मठाचे मठाधीश शिवबसव स्वामीजींच्या हस्ते मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली. सकाळी 6 वाजता हनुमान जन्मसोहळा साजरा करण्यात आला. यावेळी महिलांनी पाळणा गीत सादर केले. सकाळी 7 वाजता भव्य होमहवनाचा कार्यक्रम झाला. भास्कर भडगावे व मीनाक्षी भडगावे यांच्या हस्ते विधीवत होमहवन झाला. शिवय्या स्वामी, मल्लय्या स्वामी व दुंडय्या स्वामी यांनी पूजाविधी केला.

सकाळी 10 वाजता मूर्तीकार इंद्रजीत बाळकृष्ण जाधव देसाई यांचा सत्कार करण्यात आला. 11 वाजता भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी सुमारे 1500 भाविकांनी देवदर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी जीर्णोद्धार कमिटीचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.