|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » मंत्री विश्वजीत राणेंवर टीका करण्याचा काँग्रेसला अधिकार नाही

मंत्री विश्वजीत राणेंवर टीका करण्याचा काँग्रेसला अधिकार नाही 

प्रतिनिधी /वाळपई :

वाळपईचे माजी आमदार तथा मंत्री विश्वजीत राणे यांनी भाजप मध्ये प्रवेश करून मतदारसंघाच्या विकासाचे पाऊल उचलले आहे. मागील अनेक वर्षे काँग्रेस पक्षात प्रामाणिकपणे राहून देखील त्यांना काँग्रेसकडून चांगली वागणूक मिळाली नाही, त्यापेक्षा चांगली वागणूक भाजपने अल्पावधीतच दिली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे 17 आमदार निवडून येऊन देखील सरकार स्थापन करण्याची धमक नसणाऱया काँग्रेसला विश्वजीत राणे यांचेवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. असा आरोप वाळपई नगरपालिका मंडळातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष रामदास शिरोडकर यांनी केला आहे. यावेळी उपनगराध्यक्ष सेहझिन शेख, नगरसेवक अनिल काटकर, अतुल दातय़े, अख्तर शहा, परवीन खान, परवीन शेख, अंजली च्यारी व सरफराज सय्यद आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना शिरोडकर म्हणाले की, येत्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विश्वजीत राणे यांना 10 हजारपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून आणण्यास वाळपई मतदारसंघातील मतदार तयार असून त्याबाबत काँग्रेसने काळजी करण्याची काहीही गरज नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विश्वजीत राणे यांना दिलेला शब्द त्यांनी राणेंना मंत्रीपद देऊन खरा केल्याने वाळपई मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला भविष्यात गती येणार हे निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने विश्वजीत राणे यांच्यावर कोणत्याही प्रकारे टीका करण्याचे काहीही कारण नाही. येत्या पोटनिवडणुकीत राणे भाजपच्या उमेदवारीवर लढणार असून ते निवडून देखील येणार आहेत. वाळपई नगरपालिका मंडळ विश्वजीत राणेंच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाळपई मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न भविष्यात विश्वजीत राणे यांच्या मंत्रिपदामुळे निकालात निघेल तसेच अन्यही अनेक विकास प्रकल्प सुरू होतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.