|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » प्राथमिक शिक्षक पतपेढीत परिवर्तन

प्राथमिक शिक्षक पतपेढीत परिवर्तन 

प्रतिनिधी / रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या प्रतिष्ठेच्या ठरलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्तांतर झाले आहे. अटीतटीने लढविण्यात आलेल्या या निवडणुकीत महायुतीने 15 पैकी तब्बल 13 जागा जिंकत एकता पॅनेलचा धुव्वा उडाला. त्यामुळे 10 वर्षे एकता पॅनेलची सत्ता या पतपेढीवरून पायउतार झाली आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या संचालक मंडळासाठी रविवारी निवडणूक पार पडली होती. 96.59 टक्के इतके भरघोस मतदान झाल्याने परिवर्तन अटळ असल्याची चर्चा होतीच ती सोमवारी मतमोजणीवेळी प्रत्यक्षात आली. प्राथमिक शिक्षक संघ, पदवीधर शिक्षक संघटना, उर्दू संघटना, शिक्षक समिती, कास्ट्राईब शिक्षक संघटना यांची महायुती होती. तर शिक्षक समिती व शिक्षक संघ यांची एकता आघाडी स्थापन झाली होती. महायुती व एकता पॅनल यांनी ही निवडणुक जिंकण्यासाठी जोरदार मोर्चबांधणी केली होती.

रविवारी पार पडलेल्या मतदानाची सोमवारी येथील मराठा भवनमध्ये मतमोजणी झाली. या मतमोजणीच्या प्रारंभालाच तालुकास्तरावरील मतमोजणी प्रक्रियेत 9 पैकी 7 जागांवर महायुतीने काबीज केल्या. त्यानंतर झालेल्या जिल्हास्तरावरील जागांच्या मतमोजणीतही एकूण 6 जागांवर महायुती पॅनलने वर्चस्व सिद्ध केले. त्यामुळे या निवडणुकीत परिवर्तन घडून आले. तालुकास्तरावरील विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये मंडणगडमधून अर्जुन पवार (995 मते), दापोलीतून रघुनाथ शिगवण (342 मते), खेडमधून संतोष उत्तेकर (333), चिपळूण बळीराम मोरे (535), गुहागर सुनील रामाणे (184), संगमेश्वरमधून दिलीप महाडिक (689), रत्नागिरीतून दिलीप देवळेकर (534), लांजा तालुक्यातून दसंजय डांगे (353), राजापूरमधून विलास जाधव (663) मते घेत हे उमेदवार विजयी ठरले.

रत्नागिरी जिल्हास्तरीय जागांवर प्रकाश पाध्ये (3606), राखीव अनुसूचित जाती-जमाती जिल्हाक्षेत्रातून अनंत कदम (3591), राखिव महिला प्रतिनिधी जिल्हा क्षेत्रातून नसरिन खडस (3523) आणि स्नेहल यशवंतराव (2493), राखिव इतर मागास प्रतिनिधी जिल्हाक्षेत्रातून चंद्रकांत पावसकर (3826), राखिव विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग जिल्हा क्षेत्रातून अजय गराटे (3491) मते घेऊन विजय प्राप्त केला. या निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ता परिवर्तन झाल्याने महायुतीने जल्लोष साजरा केला. मतमोजणी केंद्राबाहेर फटाक्यांची जोरदार आतषबाजी, एकमेकांवर गुलालाची उधळण करत सवाद्य जंगी मिरवणूकही काढली. या विजयाबद्दल आमदार उदय सामंत यांनी महायुतीचे दुरध्वनीवरून अभिनंदन केले.

राजकारण करणाऱयांना मिळाला धडा-बांडागळे

महायुतीने शिक्षकांच्या प्रश्नासाठी जी आश्वासने दिली, जाहिरनामा मांडला, तो या निवडणुकीत सार्थकी लागला आहे. या जाहीरनाम्यानुसार कारभार हाताळला जाईल. निवडून आलेल्या नव्या संचालकांच्या कारभारावर महायुतीची नजर रहाणार आहे. शिक्षक समितीच्या माध्यमातून आपणाला बाजूला करण्यात आले. मात्र या निवडणुकीत बाजूला करण्याचे राजकारण करणाऱयांना आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली असल्याचे महायुतीचे ज्येष्ठ पदाधिकारी बबन बांडागळे यांनी सांगितले.