|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » सिव्हीलच्या भूलतज्ञ समस्येला आरोग्य संचालनालयच जबाबदार?सिव्हीलच्या भूलतज्ञ समस्येला आरोग्य संचालनालयच जबाबदार? 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गेल्या पाच वर्षापासून जिल्हा शासकीय रूग्णालयात एकही भूलतज्ञ नसल्याची वस्तुस्थिती आरोग्य विभागाला माहिती होती. असे असतानाही भूलतज्ञ डॉ. केशव गुट्टे यांची पहिली नियुक्ती आरोग्य संचालनालयाने रत्नागिरीतील वाटद प्राथमिक आरोग्य केंद्रात केली. तर दुसरीकडे सिव्हीलमध्येच यापुर्वी काम करणाऱया डॉ. रामचंद्र लवटे यांना दापोलीत नियुक्ती देण्यात आली. प्राथमिक केंद्रात शस्त्रक्रियाच होत नसतानाही त्यांची नियुक्ती तेथे का करण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे. त्याचवेळी डॉ. गुट्टे अथवा डॉ. लवटे यांची नियुक्ती सिव्हीलला भूलतज्ञ म्हणून केली असती तर आज ही समस्याच उद्भवली नसती, अशी चर्चा वैद्यकीय वर्तुळात सुरू आहे.

जिल्हा शासकीय रूग्णालयाला कायमस्वरूपी भूलतज्ञ मिळाला यासाठी वारंवार आरोग्य खात्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आले. अनेकवेळा मंत्रीमहोदयांकडही गाऱहाणे मांडून झाले. कोकणचे सुपुत्र असलेले विद्यमान आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत रत्नागिरी सिव्हीलला भेटही देऊन गेले. येथील समस्या त्यांना चांगल्यारितीने माहिती आहे. स्थानिक आमदार उदय सामंत, राजन साळवी हे सिव्हीलच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवत आले आहेत.

असे असतानाहीदेखील सहा महिन्यापूर्वी एमडी असणारे भूलतज्ञ डॉ. केशव गुट्टे यांचा नियुक्ती सिव्हीलला करण्याऐवजी थेट वाटद प्राथमिक केंद्रात करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोणत्याही मोठय़ा शस्त्रक्रिया होत नाहीत, गरज भासल्यास येथील रूग्णाना सिव्हीलमध्येच दाखल केले जाते. हे सर्व ज्ञात असतानही सिव्हीलला गरज असतानाही ते पद रिक्त ठेवत डॉ. केशव गुट्टे यांची नियुक्ती प्राथमिक आरोग्य केंद्रात का करण्यात आली याबाबत उलट-सुलट चर्चा वैद्यकीय क्षेत्रात सुरू आहे.

दुसरी हास्यास्पद बाब म्हणजे डॉ. रामचंद्र लवटे यांनी यापूर्वी सिव्हीलमध्येच सहा महिने भूलतज्ञ म्हणून प्रामाणिक डय़ुटी बजावली आहे. याठिकाणी डॉ. लवटे यांनी कुटुंबासह स्थलांतर केले होते. अशातच त्यांची बदली दापोली येथे झाली, सिव्हीलमध्ये जिल्हय़ाच्या कानाकोपऱयातील विविध आजारांची, अपघातांतील रूग्ण उपचारासाठी येत असतात. सर्वाधिक शस्त्रक्रिया याचठिकाणी होतात. असे असतानाही डॉ. लवटेंची बदली दापोलीला करण्यामागे काय गौडबंगाल आहे हेच न कळणारे आहे. आरोग्य संचलनालयाच्या या नियोजनशून्य कारभारामुळेच सिव्हीलमधील तज्ञांची समस्या आणखी गंभीर होत चालल्याची चर्चा आहे.

कोकणचे सुपुत्र म्हणून कोकणातील आरोग्य सुविधांकडे डॉ. दिपक सावंत विशेष लक्ष देतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांच्याकडून निराशाच झाली आहे. रत्नागिरीतील वस्तूस्थितीची माहिती असतानाही त्यावर उपाययोजना करण्यात, देषींवर कारवाई करण्याचे धाडस ते दाखवत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. आरोग्य संचालकही हा विषय गांभिर्याने घेण्याऐवजी केवळ दूरध्वनी व व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तात्पुरती मलमपट्टी करण्यातच धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. .

श्रेयवादापेक्षा समस्या सोडवा

भूलतज्ञ व अन्य वैद्यकीय अधिकाऱयांचा मुद्दा ऐरणीवर आला असताना काही राजकीय पक्षांनी श्रेयवादाची लढाई सुरू केली आहे. सेनेच्या आमदारांनी विशेषतः राजन साळवी यांनी सिव्हीलच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून भूलतज्ञ मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते हजर झाले नाहीत. यावर आता इतर पक्षांनी राजकारण सुरू केले आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याची गरज असताना सेनेला टार्गेट करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!