|Monday, July 31, 2017
You are here: Home » क्रिडा » गुहागरची कन्या माधवीला जागतिक चेस बॉक्सिंगमध्ये सुवर्णगुहागरची कन्या माधवीला जागतिक चेस बॉक्सिंगमध्ये सुवर्ण 

मिनल जोशी / कारूळ :

मुंबई-घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालयात बी. एम. एस.च्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या व याच महाविद्यालयात मिक्स मार्शलचे प्रशिक्षण घेत असलेल्या मुळच्या गुहागर तालुक्यातील खोडदे गावातील माधवी रामचंद्र गोणबरे हिने कोलकत्ता येथे पार पडलेल्या जागतिक चेस बॉक्सिंग स्पर्धेत 48 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले.

12 ते 14 एप्रिल दरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात विदेशी स्पर्धक उपस्थित न राहिल्यामुळे तिचा हा सामना पश्चिम बंगालच्या रजनी विरूध्द पार पडला. या खेळाडूला चेकमेट करत तिने विजय प्राप्त केला. माधवीची आर्थिक परिस्थिती प्रचंड हालाखीची आहे. वडिलांच्या निधनानंतर तिची आई शर्मिला या एका शाळेत साफसफाईचे काम करतात, तर भाऊ हा इलेक्ट्रीकची छोटी-मोठी कामे करतो. अशा परिस्थितीतच माधवीने शिक्षण घेत मिक्स मार्शल हा खेळ जोपासला आहे.

माधवी ही मुंबई चांदिवली येथील संघर्ष नगर विभागात राहते. स्पर्धेसाठी कोलकत्ता येथे जाण्यासाठीदेखील तिच्याकडे पैसे नव्हते. सोशल नेटवर्किंगवरून केलेल्या आवाहनानंतर तिला अनेकांनी मदतीचा हात दिला. यामध्ये पुनम महाजन, नसिम खान, ममुकेश लिलावत, शरद भावे व संघर्ष यांनी दिलेल्या आर्थिक पाठबळामुळे या स्पर्धेमध्ये माधवी सहभागी झाली होती. या स्पर्धेमध्ये भारत, रशिया, फ्रान्स, इटली, इराण, जर्मनी आदी देशांनी सहभाग घेतला होता. हि स्पर्धा  भारताचे मोटदास व जर्मनीचे एपीरोबीन यांनी आयोजित केली होती.

रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये मिक्स मार्शल आर्टच्या एक्स नाईल क्लबमध्ये सुरेंद्र पांडे आणि शिवकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली माधवी मार्शल आर्ट शिकत आहे. तिला भविष्यामध्ये एमबीए करून ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करायचे असून स्वतःचा मिक्स मार्शल आर्टचा क्लासही सुरू करायची इच्छा आहे. याआधी मुंबई किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व कांस्य पदक, महाराष्ट्र किक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये रौप्यपदक आणि विशाखापट्टणम येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावर कास्यपदक तिने पटकावले आहे.

 

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!