|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » जलसमृद्धीसाठी ‘कोकण जलचेतना चषक’ स्पर्धा

जलसमृद्धीसाठी ‘कोकण जलचेतना चषक’ स्पर्धा 

नदी म्हणजे जीवन, नदी म्हणजे समृद्धी. ज्या ठिकाणी नद्यांचे स्वास्थ बिघडते त्या ठिकाणी समाजाचेही स्वास्थ बिघडते. यामुळेच कोकणाच्या विकासाची स्थिती चिंताजनक आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली आणि पाणी विषयातील नोबेल आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील चार नद्या (गांधारी, जगबुडी, अर्जुना, जानवली) पुनर्जीवनाची योजना समृद्ध कोकणच्या माध्यमातून सुरू आहेत. हे अभियान केवळ चार नद्यांपुरता न राहता जलसमृद्धीची केकणात राबवली जावी म्हणून लोकचळवळ सुरू होत आहे. याचे पहिले पाऊल म्हणून ‘समृद्ध कोकण जलचेतना चषक’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.

या स्पर्धेतंर्गत कोकणातील उद्योजक, सामाजिक संस्था, मुंबईकर ग्रामस्थ मंडळी आणि ग्रामस्थ यांना पुढाकार घ्यावा. आपल्या गावात जलसंवर्धनाची कामे करावीत, या वर्षी गावातील नदी (डोह) मधील गाळ काढणे, पक्का बंधारा, साखळी बंधारे अशा प्रकारची कामे लोक सहभागातून करावीत याचबरोबर जंगलसंवर्धन, फळबाग लागवड करावी, ग्रामस्थ मंडळांना आणि उद्योजकांना सहभाग घेता येईल. वर्षभरात बंधारे बांधणे, गाळ काढणे, जून-जुलै महिन्यात फलोद्यान आणि वनलागवड अशा स्वरुपाची कामे अपेक्षित आहेत. यासाठी आवश्यक मार्गदर्शक समृद्ध कोकणाच्यावतीने दिले जाईल. 5 मे ते 10 मे या कालावधीत प्रत्येक जिह्याच्या तज्ञांच्या उपस्थित मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 5 लाख, द्वितीय 2 लाख, तृतीय 1 लाख  आणि उत्तेजनार्थ 50 रुपयांची पाच पारितोषिक ठेवली आहेत. मार्च-एप्रिल 2018 मध्ये या सर्व कामाचे परिक्षण करून मे महिन्यात विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो कोकणवासीयांच्या उपस्थित पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जाईल. या स्पर्धेचे संयोजन प्रमोद जठार आणि किशोर धारिया यांनी केले आहे. जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ‘समृद्ध कोकण’चे अध्यक्ष संजय यादवराव यांनी केले आहे.