|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » दिल्ली पोलिसांकडून दिनकरन यांची झाडाझडती

दिल्ली पोलिसांकडून दिनकरन यांची झाडाझडती 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक आयोगाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अण्णाद्रमुकच्या नेत्या शशिकला यांचे पुतणे टीटीव्ही दिनकरन शनिवारी दिल्ली पोलिसांसमोर हजर झाले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या आरके नगर मतदारसंघातील पोटनिवडणुकीपूर्वी अण्णाद्रमुक पक्षात दोन गट पडले. त्यामुळे पक्षाचे अधिकृत चिन्हा ‘दोन पान’ आयोगाने रद्द केले होते. हे चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी दिनकरण यांनी निवडणूक अधिकाऱयांना तब्बल 50 कोटी रुपयांची लाच देण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी त्यांनी सुकेश चंद्रशेखर या दलालाची मदत घेतली. पोलिसांनी चंदशेखर याला अटक केली. त्याच्याकडून 1 कोटी 30 लाखांची रोकड व दोन अलिशान कार जप्त करण्यात आल्या होत्या. त्याने दिलेल्या माहितीनंतर दिनकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. 19 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना समन्स बजावले होते. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारारस दिनकरन हे दिल्ली पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी चाणक्यपुरी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही परिसरात येण्यास मज्जाव करण्यात आला होता.

आर. के. नगर विधानसभा मतदारसंघात 12 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार होती. यासाठी शशिकला गटास ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कळघम अम्मा (एमआयडीएमके) तर पन्नीरसेल्वम गटाला एमआयडीएमके पुराटची थलैवी अम्मा असे नाव देण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली होती. या दोन्ही गटांनी पक्षाचे निवडणूक चिन्हा ‘दोन पान’वर दावा केला होता. या वादावर निकाल देताना निवडणूक आयोगाने शशिकला गटाला टोपी तर पन्नीरसेल्वम गटाला विजेचा खांब निवडणूक चिन्ह दिले होते. मात्र मतदारांना लाच दिल्याचे उघड झाल्याने ही निवडणूक रद्द करण्यात आली होती.