|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गडहिंग्लजला अन्न व औषध प्रशासनाचे मार्गदर्शन शिबीर

गडहिंग्लजला अन्न व औषध प्रशासनाचे मार्गदर्शन शिबीर 

प्रतिनिधी / गडहिंग्लज

अन्न सुरक्षा ही भविष्याची संपत्ती असल्यामुळे अन्न सुरक्षा कायद्याचे पालन काटेकोरपणे केले पाहिजे, नाहीतर सामान्य लोकांच्या जीवाची हेळसांड होईल. याचीच खबरदारी म्हणून अन्नसुरक्षा कायदा 2011 ची अंमलबजावणी काटेकोरपणे करा असे आवाहन पुणे विभागाचे सहआयुक्त एस. एस. देसाई यांनी केले. येथील नगरपालिकेच्या शाहू सभागृहात गडहिंग्लज शहर किराणा भुसार असोसिएशन, अन्न व औषध प्रशासन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबीरात ते बोलत होते.

शिबीराच्या अध्यक्षस्थानी शहर किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत तेलवेकर होते. शिबीराची सुरूवात जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देत रोपटय़ास पाणी घालून करण्यात आली. यावेळी पुणेचे प्रशासकीय अधिकारी के. एस. शिंदे, पुणे अन्न सुरक्षा अधिकारी एस. एम. कुलकर्णी, कोल्हापूर अन्न सुरक्षा अधिकारी बी. डी. मुळे, एम. डी. पाटील, निवृत्त अन्न सुरक्षा अधिकारी के. ए. शिंत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत नगरसेवक राजेश बोरगावे यांनी केले. श्री. देसाई पुढे म्हणाले की, अन्न सुरक्षा कायदा 2006 यामधील अनेक विधायक सुधारणा करून 2011 साली नवा अन्न सुरक्षा कायदा देशात लागू करण्यात आला. कायद्याच्या आधारे समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत वंचितांना अन्न पुरवठा या कायद्यामुळे होऊ शकेल. अन्न सुरक्षा कायद्यातील कायदेशिर बाबींची विस्तृत माहिती सांगण्यात आली. त्याचबरोबर राज्यातील भेसळयुक्त मालाची विक्री करणाऱया व्यापाऱयांवर धडक कारवाईचे उदाहरण चित्रफितीद्वारे दाखवण्यात आले.

कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त एस. ए. चौगुले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, भेसळयुक्त अन्नपदार्थ विक्री केल्यानंतर व्यक्तींवर कोणकोणत्या प्रकारचे दुष्परिणाम होतात याची माहिती दिली. यावेळी व्यापाऱयांचा परवाना, नोंदणी व शुल्क आदी प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. शेवटी उमाशंकर मोहिते यांनी आभार मानले. शिबीरास आण्णाप्पा गाताडे, दिपक कोळकी, चंद्रकांत जमदाडे, शिवानंद कोरी, राजेंद्र बस्ताडे, समिर हत्ती, भैरू गंधवाले, संजय भुरगुडे, पोपट रिंगणे, उदय कुंभार, यांच्यासह गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील हॉटेलधारक, किराणा दुकानदार, पाणपट्टीधारक, भाजीपाला विक्रेते आदी उपस्थित होते.