|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘श्रीरंग’ च्या नाटय़लेखन स्पर्धेतून साकारली ‘संहिता बँक’!

‘श्रीरंग’ च्या नाटय़लेखन स्पर्धेतून साकारली ‘संहिता बँक’! 

अभिजित नांदगावकर/ रत्नागिरी

उत्तम नाटय़कलाकृती निर्माण होण्यासाठी आवश्यकता असते ती उत्तम संहितेची! अर्थात उत्तम संहितांचे लेखन होण्यासाठी जाणकार नाटय़लेखकाची आवश्यकता असते. रत्नागिरीच्या नाटय़क्षेत्रातील अग्रणी नाटय़संस्था ‘श्रीरंग’चे अध्यक्ष भाग्येश खरे यांनी या गोष्टी जाणल्या आणि एक राज्यस्तरीय स्पर्धा प्रत्यक्षात आली ती म्हणजे ‘प्र. ल. मयेकर स्मृति नाटय़लेखन स्पर्धा’! या स्पर्धेला यावर्षी एक तप पूर्ण होत आहे. या 12 वर्षात ‘श्रीरंग नाटय़संस्थे’कडे ‘संहिता बँक’ची निर्मिती झाली असून तब्बल 450 संहिता या ‘बँक’मध्ये उपलब्ध असल्याची माहिती भाग्येश खरे यांनी  ‘जागतिक पुस्तक दिनाच्या’ पुर्वसंध्येला ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

‘श्रीरंग’तर्फे 2006 साली या स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला.  आता ही स्पर्धा अगदी बेळगाव, इंदौर आदी शहरांपर्यांत पोहोचली आहे. प्रतिवर्षी या स्पर्धेत सुमारे 50 नाटय़लेखकांचा सहभाग घेतात त्यामुळे ‘श्रीरंग’च्या ‘संहिता बँक’मध्ये 50 नव्या संहिता जमा होतात. अशा प्रकारची स्पर्धा घेणारी ‘श्रीरंग’ ही राज्यातील एकमेव नाटय़संस्था आहे.

‘संहिता बँक’बाबत माहिती देताना खरे म्हणाले की, पहिल्या वर्षीपासूनच या स्पर्धेला नाटय़लेखकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षीच 63 नाटय़संहिता या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेमुळे नाटय़लेखक लिहिता झाला. यानिमित्ताने व्यवहारातील, कौटुंबिक, सामाजिक विविध विषयांची मांडणी होऊ लागली. नाटय़लेखकाकडून स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळे विषय हाताळले जाऊ लागले. हे या स्पर्धेचे फलित म्हणावे लागेल.

संहिता बँकेत नाटय़लेखिकांच्या संहिता

नाटय़क्षेत्रात नाटय़लेखकांचीच नावे प्रकर्षाने डोळ्य़ासमोर येतात. नाटय़लेखिका त्यामानाने दिसून येत नाहीत. मात्र ‘श्रीरंग’च्या ‘संहिता बँक’कडे पाहिले असता, यामध्ये नाटय़लेखिकाही लिहित्या झाल्याचे दिसून येत आहेत. नाटय़लेखिकांच्याही संहिता ‘संहिता बँक’मध्ये जमा झाल्या आहेत. या संहितांतील अंजली पुराणिक, संध्या देशपांडे, नीता गद्रे यांच्या संहिता विशेष उल्लेखनीय ठरल्या आहेत. या स्पर्धेतून 8 ते 10 चांगले नाटय़लेखक नाटय़क्षेत्राला मिळाले आहेत. या स्पर्धेमुळे विद्यासागर अध्यापक, समीर मोने, सुबोध हर्डिकर यांसारखे नाटय़लेखक नाटय़क्षेत्राला मिळाले आहेत.

विनोदी संहितांची कमतरता

नाटय़लेखन स्पर्धा असल्याने नाटय़लेखकांकडून समाजातील विविध गंभीर विषय, सामाजिक, कौटुंबिक विषय संहिता लिहिताना हाताळले जातात. मात्र विनोदी विषय मात्र अत्यंत कमी हाताळले जातात. विनोदी संहिताही लिहिल्या जाव्यात, अशी अपेक्षा भाग्येश खरे यांनी व्यक्त केली.

रत्नागिरीतील नाटय़लेखकांचा सहभाग वाढावा

कोकणातील विशेषतः रत्नागिरीतून नाटय़लेखकांचा मात्र या स्पर्धेत सहभाग म्हणावा तसा होत नसल्याची खंत खरे यांनी बोलून दाखवली. नाटय़क्षेत्रातील इतर क्षेत्रांत येथील मंडळी पुढे येत असल्याचे दिसून येते. मात्र नाटय़लेखनाकडे येथील क्षेत्र तितकेसे वळलेले नसल्याचे दिसून येते. तसेच युवा लेखकांचाही सहभाग स्पर्धेत कमी दिसत आहे, तो वाढावा अशी अपेक्षा आहे. यासाठी युवांनी आधी वाचण्याची आणि आजूबाजूला डोळसपणे पहाण्याची गरज असल्याचे खरे यांनी सांगितले.

या स्पर्धेचे सुरूवातीचे परीक्षण दिवंगत प्रख्यात नाटय़लेखक प्र.ल. मयेकर आणि रत्नागिरीतील प्रतिभावान दिग्दर्शक अविनाश फणसेकर यांनी केले होते. आता पुण्याचे नाटककार समीर मोने हे या नाटय़स्पर्धेचे परीक्षण करत आहेत. पहिल्याच वर्षी समिक्षक कमलाकर नाडकर्णी यांच्याकडून या स्पर्धेचे कौतुक झाले होते. तर प्रसिद्ध विनोदी अभिनेते प्रदिप पटवर्धन यांनी ‘संहिता बँक’मधून 3 संहिता नेल्या. अशाचप्रकारे दिग्दर्शक, निर्मात्यांचा या ‘संहिता बँक’ला प्रतिसाद मिळून त्यातून उत्तमोत्तम नाटकांची निर्मिती व्हावी, हा या ‘संहिता बँक’, तसेच स्पर्धेमागचा मुख्य उद्देश असल्याचे खरे यांनी सांगितले.

ही नाटय़लेखन स्पर्धा अशीच पुढे सुरू ठेवण्याचा निर्धार अध्यक्ष भाग्येश खरे यांनी ‘तरूण भारत’जवळ बोलून दाखवला. या स्पर्धेसाठी ज्येष्ठ रंगकर्मी किरण साळवी यांचे भक्कम प्रायोजकत्त्व लाभले आहे. तर सुरूवातीच्या कालावधीत आमदार उदय सामंत यांनीही या स्पर्धेला सहकार्य केले होते. या स्पर्धेतूनच आता पुढे ही ‘संहिता बँक’ आणखी उत्तमोत्तम नाटय़संहितांनी समृद्ध होईल, यात शंका नाही.