|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ऐन उन्हाळय़ात कूर उपकालवा पाण्याअभावी कोरडा

ऐन उन्हाळय़ात कूर उपकालवा पाण्याअभावी कोरडा 

वार्ताहर/ कूर

काळम्मावाडी प्रकल्पाचा डावा कालवा सतत पाण्याने दुथडी भरून वाहत असताना या कालव्यातून काढलेला कूर उपकालवा ऐन उन्हाळय़ात कोरडा ठण पडला आहे. कडक उन्हाळा सुरू असतानाही या उपकालव्यातून महिन्यातून फक्त एकदाच आठवडाभर पाणी सोडले जात असल्याने माळरानावरती असलेले हजारो हेक्टरातील ऊसपिक पाण्याअभावी सोकत चालले आहे.

कूर उपकालव्यामुळे भुदरगडच्या पश्चिम भागातील मुदाळ, कोनवडे, नाधवडे, टिक्केवाडी, दारवड, निळपण, पाचवडेसह मिणचे खोरीतील अनेक गावातील हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. सुमारे 16 कि. मी. लांबीचा असलेल्या या उपकालव्याच्या पाण्यावर शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणावर ऊसपिक घेतले आहे. यातील काही क्षेत्र कालव्याच्या खाली तर बहुतांशी क्षेत्र उपसा क्षेत्रात येते. हे क्षेत्र शेतकऱयांनी खाजगी सायपन व पाणी योजनाव्दारे ओलिताखाली आणले आहे. पाटबंधारे खात्यामार्फत या भागातून लाखो रूपये पाणीपट्टी वसूल केली जात आहे. मात्र पाणी सोडण्याच्या नियोजनामध्ये सुसुत्रता नसल्याने अनेकवेळा पिके वाळून गेली तरी पाणी सोडले जात नाही. हा भाग कोरडवाहू व पठारी असल्याने पिकांना किमान आठवडय़ातून एकवेळ पाणी देणे गरजेचे असते.

मुदाळ तिट्टय़ावरून जाणारा डावा कालवा सतत पाण्याने भरून वाहत असतो. पण कूर उपकालव्यातून वेळेवर पाणी सोडले जात नाही. यासाठी अनेकवेळा शेतकऱयांनी निवेदने दिली. संबंधित कर्मचाऱयांबरोबर वादविवादही झाले. पण त्याला दाद दिली जात नाही. महिन्यातून फक्त एकादाच आठवडाभर पाणी सोडले जाते. हे पाणी कसेतरी निळपणपर्यंत पोहचते. मात्र त्यापुढे असलेल्या मिणचे खोरीतील गावांना पाणी पोहचत नाही. आठवडा संपताच पाणी बंद केले जाते. त्यामुळे पाण्याअभावी मिणचे खोरीतील ऊसपिकांची वाढ खुंटली असून पिके सोकत आहेत. यासाठी किमान उन्हाळय़ाच्या दिवसात 15 दिवसातून एकदा पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.