|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबरच ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लोकसभेबरोबरच ? 

एका ज्येष्ठ भाजप नेत्याकडून संकेत, चाचपणी सुरू असल्याची माहिती

नवी दिल्ली / प्रतिनिधी 

लोकसभेची निवडणूक एप्रिल, मे 2019 मध्ये होणार आहे. त्याच निवडणुकीबरोबर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घेतली जाणार असल्याचे संकेत राज्यातील एका ज्येष्ठ भाजप नेत्याने दिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक नेहमीपेक्षा सहा महिने आधी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 1999 मध्ये असा प्रयोग करण्यात आला होता, याची आठवणही याप्रसंगी करण्यात आली.

तीन दिवसांपूर्वी येथे नीती आयोगाची बैठक झाली होती. या बैठकीनंतर भाजप मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत घेण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत लोकसभेबरोबरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक घ्यावी, हा मुद्दा चर्चिला गेला, अशी माहिती या ज्येष्ठ नेत्याने दिली.

लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही व्हाव्यात, म्हणजे प्रशासनाच्या दृष्टीने सोयीचे होईल, असे विधान मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. तोच धागा पकडून महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचीही चर्चा होत आहे. नीती आयोगाच्या बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्येही हा मुद्दा चर्चिला गेला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव एकत्र निवडणुकांच्या प्रस्तावाला अनुकूलता दर्शविली. काही भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचेही असेच मत होते, अशी सूत्रांची माहिती आहे.

बऱयाच अडचणीही

मात्र ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात अनेक अडचणी आहेत. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड येथे लोकसभेनंतर सहा महिन्यातच विधानसभा निवडणूक होत असते. या सर्व राज्यात सध्या भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे तेथे लोकसभेसमवेतच विधानसभा निवडणूक होणे शक्य आहे. पण गुजरात आणि हिमाचल प्रदेशात लोकसभेपूर्वी दीड वर्ष विधानसभा निवडणूक होते. ती लोकससभेबरोबर घेणे शक्य नाही. तसेच मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे लोकसभेपूर्वी सहा महिने निवडणूक होते. ती सहा महिने लांबवता येणे शक्य नाही. तसेच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर येथील निवडणूक नुकतीच पार पडली आहे. तेथे पुन्हा दोन वर्षांमध्ये निवडणूक घेण्यास तेथील मुख्यमंत्री तयार होणार नाहीत. शिवाय बिगर भाजप राज्यांचे मुख्यमंत्र्यांकडूनही हा प्रस्ताव मान्य होणे दुरापास्त आहे. त्यामुळे सर्व राज्यांची विधानसभा निवडणूक लोकसभेच्या निवडणुकीबरोबर घेणे व्यवहारीदृष्टय़ा शक्य होणार नाही. म्हणून महाराष्ट्राची निवडणूक लोकसभेबरोर घेता आली तर पहावे, असा विचार भाजपच्या राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे समजते.

युतीचे काय ?

2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सेना व भाजप युती तुटली होती. पण कदाचित 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती करण्याची आवश्यकता दोन्ही पक्षांना वाटू शकते. भाजपचा राज्यात प्रमुख लढा काँगेस आणि राष्ट्रवादीशीच आहे, असेही या ज्येष्ठ नेत्याने म्हटले. परिणामी, युती करण्याचा प्रयत्न होईल, असे संकेत मिळत आहेत. पण दोन्ही पक्षांचे सध्याचे बळ एकमेकांनी लक्षात घेतले पाहिजे, असेही या नेत्याने सांगितले.

नारायण राणे संपर्कात

नारायण राणे भाजपच्या संपर्कात आहेत. पण त्यांच्या पक्षप्रवेशासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती सूत्रंानी दिली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळलेले नव्हते. त्यामुळे तेव्हा नारायण राणेंशीही संपर्क केला गेला होता, असे सांगण्यात आले. ती प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. पण त्यासंबंधी कोणतीही निश्चितात नाही. विविध स्तरांमधून राणेंशी संपर्क केला जात आहे. त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्री पातळीवरून यासंबंधी काही हालचाली होत नाहीत, तोपर्यंत या प्रक्रियेला अधिकृतता प्राप्त होणार नाही, असे सांगण्यात आले.