|Sunday, June 16, 2019
You are here: Home » क्रिडा » बेलारूस, अमेरिका अंतिम फेरीत

बेलारूस, अमेरिका अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था / मिनसेक, वेस्ले चॅपेल

फेडरेशन चषक टेनिस स्पर्धेत बेलारूस आणि अमेरिका यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. बेलारूसने स्वित्झर्लंडचा तर अमेरिकेने झेक प्रजासत्ताकच्या विश्व गट उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभव केला.

रविवारी मिनसेक येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात 18 वर्षीय सॅबेलिनेकाने स्वित्झर्लंडच्या गोलूबिकचा एकेरीच्या सामन्यात 6-3, 2-6, 6-4 असा पराभव करत आपल्या संघाला या स्पर्धेच्या अंतिम फेरीत नेले. बेलारूसने स्वित्झर्लंडवर 3-1 अशी विजयी आघाडी घेतली. तत्पूर्वी रविवारी पहिल्या एकेरी सामन्यात बेलारूसच्या सॅसेनोव्हिचने स्वित्झर्लंडच्या बॅसिनझिकायवर 6-2, 7-6 (7-2) अशी मात करत आपल्या संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली होती. हा सामना दीड तास चालला होता.

अमेरिका आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील उपांत्य लढतीत अमेरिकेने झेक प्रजासत्ताकचा 3-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. रविवारी झालेल्या महिला दुहेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या व्हँडेवेग आणि बेथेनी सँडस् यांनी झेक प्रजासत्ताकच्या प्लिसकोव्हा आणि सिनीयाकोव्हा यांचा 6-2, 6-3 असा पराभव केला. तब्बल सात वर्षांनंतर अमेरिका फेडरेशन चषक स्पर्धेत पहिल्यांदा अंतिम फेरी गाठत आहे. अमेरिका आणि बेलारूस यांच्यातील अंतिम लढत 11-12 नोव्हेंबरला होईल. अमेरिकेने आतापर्यंत 17 वेळा फेडरेशन चषकावर आपले नाव कोरले आहे.