|Monday, November 19, 2018
You are here: Home » क्रिडा » फिफा युवा विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरु

फिफा युवा विश्वचषकाचे काऊंटडाऊन सुरु 

वृत्तसंस्था /कोलकाता :

अवघ्या सहा महिन्यांच्या उंबरठय़ावर आलेल्या फिफा 17 वर्षाखालील युवा फुटबॉल चषक स्पर्धेच्या काऊंटडाऊनला शुक्रवारी थाटात प्रारंभ झाला. ‘सिटी ऑफ जॉय’ अर्थात, कोलकाता शहरात यासाठी छोटेखानी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. यंदाची ही युवा विश्वचषक स्पर्धा दि. 28 ऑक्टोबरपासून भारतात खेळवली जाणार आहे. भारतात एखादी प्रतिष्ठेची फुटबॉल स्पर्धा खेळवली जाण्याची यंदा ही पहिलीच वेळ असेल.

सहा महिन्यांच्या अंतराने दि. 28 ऑक्टोबर रोजी कोलकाता शहरातील ऐतिहासिक विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगणावर या स्पर्धेतील सलामीची लढत खेळवली जाईल व त्यानंतर देशभरातील विविध ठिकाणी फुटबॉलचा हा कार्निव्हल पोहोचणार आहे.

‘या युवा फुटबॉल चषक स्पर्धेच्या निमित्ताने अवघ्या फुटबॉल जगताचे लक्ष कोलकातावर लागून राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर फिफाची ही स्पर्धा भरवताना त्याला साजेसा आंतरराष्ट्रीय दर्जा असावा, यासाठी कसून तयारी व्हायला हवी आणि याचसाठी आम्ही पश्चिम बंगाल राज्य सरकारचे सहकार्य देखील घेत आहोत’, असे स्थानिक आयोजन समितीचे स्पर्धा संचालक झेवियर सेप्पी यांनी यावेळी नमूद केले. प्रकल्प संचालक जॉय भट्टाचार्य यांनी देखील सदर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी आपण महत्त्वाकांक्षी असल्याचे नमूद केले.

‘तब्बल 1 लाख 30 हजार चाहत्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने फुटबॉल स्टेडियम्स पॅक झाल्याचे मी अनेकदा अनुभवले आहे आणि आता जागतिक फुटबॉलची ही क्रेझ भारतात पोहोचावी, यासाठी आमचे विशेष प्रयत्न असतील’, असे भट्टाचार्य यांनी सांगितले. या स्पर्धेच्या निमित्ताने 17 वर्षाखालील वयोगटातील अनेक युवा खेळाडू भारतात प्रथमच खेळणार आहेत. रोनाल्डिन्हो, इकेर कॅसिलास, बफॉन, फॅन्सेस्को टोटी, नेमारसारखे खेळाडू त्यांच्या उमेदीच्या कालावधीत या स्पर्धेतून खेळले आहेत, हे देखील उल्लेखनीय आहे. या फुटबॉल स्पर्धेची तिकीटे दि. 16 मे रोजी सायंकाळी 7 वाजून 11 मिनिटापासून उपलब्ध असतील, असे आयोजकांनी जाहीर केले आहे.

Related posts: