|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ‘बाहुबली-2’ला लाभलाय रत्नागिरी व्हिज्युअल इफेक्टस् टच!

‘बाहुबली-2’ला लाभलाय रत्नागिरी व्हिज्युअल इफेक्टस् टच! 

अभिजित नांदगावकर /रत्नागिरी :

संपूर्ण देशभर सध्या एकच फिक्हर आहे तो म्हणजे ‘बाहुबली-2’चा! जागतिक चित्रपटसृष्टीला अवाप् करायला लावणारा…भारतीय चित्रपटसृष्टीचे सर्व रेकॉर्ड मोडणाऱया या ‘बाहुबली-2’ला रत्नागिरी टच लाभला आहे, असे आपणास सांगितल्यास आपल्याला खरे वाटणार नाही, पण हे खरे आहे! ‘बाहुबली’ चित्रपटात रत्नागिरीतील युवांच्या व्हिज्युअल इफेक्टस्चे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आपल्या भुवया निश्चितच उंचावल्या ना! होय, ‘बाहुबली’ चित्रपटातील 27 सिन्सला रत्नागिरीतील हर्षल श्रीकांत पेढे या युवाच्या ‘आचमन स्टुरिओज’मध्ये व्हिज्युअल इफेक्टस् देण्यात आले आहेत.

‘बाहुबली’चा पार्ट-2’ असलेल्या या चित्रपटाची लोकप्रियताही पहिल्या भागाहून अधिक शिगेला पोहोचली आहे. पहिल्या आठवडय़ाचे बुकींग फुल्ल असलेल्या आणि तिकीट दरही सर्वाधिक होणारा ‘बाहुबली-2’सुद्धा रसिकांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे. अशा या चित्रपटाला रत्नागिरीचा टच लाभला आहे. रत्नागिरीतील युवा हर्षल श्रीकांत पेढे याच्या मारूती मंदिर येथील श्रीकम हाईटस् इमारतीतील ‘आचमन स्टुरिओज’मध्ये ‘बाहुबली-2’ला व्हिज्युअल इफेक्टस् देण्यात आले आहेत.

‘बाहुबली’ हा चित्रपट अधिक अंगावर येतो तो त्यातील व्हिज्युअल इफेक्टस्मुळेच! पहिल्या चित्रपटातील व्हिज्युअल इफेक्टस्नी जागतिक चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे ‘बाहुबली-2’बाबतच्या अपेक्षा अधिक उंचावल्या होत्या. मात्र ‘बाहुबली-2’ने ही अपेक्षापूर्ती केली आहे. त्यामुळे तुफान लोकप्रियता मिळवलेल्या या चित्रपटाने शुक्रवारी 29 रोजी प्रदर्शनालाच रेकॉर्ड ब्रेक सुरूवात केली आहे. अशा या चित्रपटातील संपूर्ण सिन्समधील 27 सिन्समध्ये रत्नागिरीतील युवांनी दिलेल्या व्हिज्युअल इफेक्टस्चे योगदान आहे, हे निश्चितच कौतुकास्पद म्हणावे लागले.

रत्नागिरीत तांत्रिकदृष्टय़ा इतक्या सर्वोत्तम दर्जाचे काम होतेय. तसेच इतक्या उत्तम दर्जाची यंत्रणा, तसेच येथील युवांचे कामही तितकेच सर्वोत्तम दर्जाचे असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणानंतर पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू होते. ‘बाहुबली’ चित्रपटाचे तर पोस्ट प्रॉडक्शनचे, व्हिज्युअल इफेक्टस्चे कामच सर्वाधिक होते व महत्त्वपूर्ण होते. त्यावर अधिकच खर्च व लक्ष केंद्रीत करण्यात आले. चित्रपटाचे हे तांत्रिक काम देशभरातील, मुख्यत्वे मुंबईतील ऍनिमेटेड स्टुडिओजमध्ये करण्यासाठी देण्यात आले. या मुख्य स्टुडिओमधून तांत्रिक कामाची विभागणी ठिकठिकाणच्या इतर सक्षम स्टुडिओमध्ये करण्यात आली. अशा प्रकारे मुंबईतून एका मुख्य स्टुडिओमधून ही जबाबदारी रत्नागिरीच्या ‘आचमन स्टुरियोज’मध्ये सोपवण्यात आली.

रत्नागिरीच्या ‘आचमन स्टुरियोज’ने ही जबाबदारी उत्तमरित्या पेलत मुंबईतील या प्रमुख स्टुडिओची उत्तम व्हिज्युअल इफेक्टस्ची अपेक्षापूर्ती केली. प्राप्त झालेल्या रॉ-शॉटस्वर ‘आचमन स्टुरियोज’मध्ये रोटोस्कोपी, लेअर एक्ट्रक्शन आदी तांत्रिक संस्कार करून सिनेमॅटिक फिल देण्यात आला.

सुमारे 27 रॉ-शॉटस्वर असे तांत्रिक संस्कार करण्यात आले. यामध्ये मुख्यत्वे युद्धाचे सिन्स अधिक आहेत. या प्रत्येक रॉ-शॉटस्ची लांबी 5 सेकंद किंवा त्याहून कमी, अधिक होती. या एका 5 सेकंदाच्या रॉ-शॉटस्मध्ये व्हिज्युअल इफेक्टस्द्वारे जान आणण्यासाठी दोन किंवा त्याहून अधिक दिवस लागतात. जानेवारीमध्ये ‘आचमन स्टुरियोज’मध्ये ‘बाहुबली’च्या तांत्रिक कामाला सुरूवात झाली. मार्चपर्यंत हे काम सुरू होते. 27 रॉ-शॉटस्ना व्हिज्युअल इफेक्टस् देण्यासाठी सुमारे 3 महिन्यांचा कालावधी लोटला.

‘आचमन स्टुरियोज’चा युवा संचालक हर्षल पेढेने सांगितले की, जागतिक पातळीवरच्या सिनेमाच्या तांत्रिक कामाची जबाबदारी रत्नागिरीत आम्हाला करायला मिळणे, तसेच आमच्यावर इतका विश्वास आमच्यावर टाकणे, ही आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. आम्हीही आमच्यावर टाकलेल्या विश्वासावर खरे उतरलो, याचा आम्हाला आनंद आहे.

हॉलिवुड, बॉलिवुड चित्रपटांना इफेक्टस्

हॉलिवुडमधील टान्सफॉर्मन्स, डिझने प्रॉडक्शनचा बहुचर्चित ‘ब्युटी ऍण्ड बिस्ट’ यांसारख्या चित्रपटांसह काही चायनीज प्रोजेक्ट, टिव्ही ऍडस्चे काम या स्टुरियोजमध्ये करण्यात आले आहे. तसेच बॉलिवुडमधील गाजलेले चित्रपट बाजीराव मस्तानी, बेबी, रईस, दंगल या चित्रपटांच्याही व्हिज्युअल इफेक्टस्चे काम रत्नागिरीतील या ‘आचमन स्टुरियोज’मध्ये झाले आहे. निश्चितच ही बाब कौतुकास्पद आहे.

युवांनी या क्षेत्राकडे वळावे-पेढे

हर्षल पेढे हा रत्नागिरीतील सैतवडे येथील आहे. डिप्लोमा इन ऍनिमेशन ऍण्ड व्हिएफएक्स कोर्स 2005 साली केल्यानंतर पेढे यांनी मुंबईतील स्टुडिओमध्ये 2010 सालापर्यंत काम केले. त्यानंतर रत्नागिरीत येण्याचा निर्णय घेऊन 2011 साली इथे येऊन ‘ग्रीन लिफ्स ऍनिमेशन इन्टिटय़ुट ऍनिमेशन ट्रेनिंग इन्टिटय़ुट’ची स्थापना केली. याद्वारे त्याने आतापर्यंत सुमारे 50 हून अधिक जणांना ऍनिमेशनचे शिक्षण दिले आहे आणि ते युवा सध्या मुंबई, पुण्यामध्ये उत्तम काम करत आहेत. युवांनी या क्षेत्राकडे वळण्याचे आवाहन पेढे याने केले आहे. इन्टिटय़ुटच्या स्थापनेनंतर 2014 ला प्रॉडक्शनमध्ये उतरून ‘आचमन स्टुरियोज’ची स्थापना केली. याद्वारे आता रत्नागिरीत हॉलिवुड, बॉलिवुड चित्रपटांना व्हिज्युअल इफेक्टस् देण्यात येत आहेत.

Related posts: