|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न

कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

कामगारांच्या हितासाठी काँग्रेस कटीबद्ध

मुंबई / प्रतिनिधी

उद्योगपतींच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी येथे केला. कामगारांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष कटीबद्ध असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

महाराष्ट्र दिनानिमित्त अशोक चव्हाण यांनी आज हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून संयुक्त महाराष्ट्रसाठी बलिदान देणाऱया हुतात्म्यांना वंदन केले. त्यानंतर प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या ‘टिळक भवन’मध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

महाराष्ट्राच्या स्थापनेपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे महाराष्ट्र प्रगत राज्य झाले. त्यावेळच्या सरकारांनी राबवलेल्या धोरणामुळे महाराष्ट्राची उद्योगधंद्यात भरभराट झाली. लोकांना रोजगार मिळाला. तत्कालीन काँग्रेसने कायम कामगारांच्या हिताचे रक्षण केले. परंतु, आता केंदातील आणि राज्यातील भाजप सरकार कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करीत आहे. कायद्यातील कामगार विरोधी बदलाला विरोध करून काँग्रेस पक्ष कामगारांच्या आणि कष्टकऱयांच्या हितासाठी सरकारविरोधातील संघर्ष आणखी तीव्र करेल, असे चव्हाण म्हणाले.

यावेळी काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेश काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस, माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह, प्रदेश सेवादलाचे अध्यक्ष चंद्रकांत दायमा, अनुसूचित जाती विभागाचे रवींद्र दळवी, प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण ओझा, रमेश शेट्टी, पृथ्वीराज साठे आदी उपस्थित होते.