|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चौपदरीकरणासाठी बांधकामांवर 1 सप्टेंबरनंतर ‘हातोडा’!

चौपदरीकरणासाठी बांधकामांवर 1 सप्टेंबरनंतर ‘हातोडा’! 

मुंबई-गोवा महामार्गाचा कंपन्यांकडून आराखडा तयार    पावसाळय़ानंतरच प्रत्यक्षात कामाला प्रारंभ होण्याची शक्यता

प्रतिनिधी/ चिपळूण

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील जागा, इमारत मालकांना मोबदला वाटपाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला असला तरी प्रत्यक्षात चौपदरीकरणातील मालमत्तांवर लगेचच ‘हातोडा’ टाकला जाणार नाही. पावसाळय़ानंतरच शक्यतो 1 सप्टेंबरनंतर त्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. चौपदरीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या 11 टप्प्यांमध्ये जेथे 80 टक्के जागा ताब्यात येईल तेथेच ती प्रक्रिया सुरू केली जाणार असून त्या दृष्टीने ठेका घेतलेल्या बांधकाम कंपन्यांनी आराखडा तयार केला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱयांकडून प्राप्त झाली आहे.

महामार्ग चौपदरीकरणाच्या भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, संगमेश्वर येथील जागा मालकांना मोबदल्यापोटी 381 कोटी रुपये प्राप्त झाल्यानंतर शहर वगळून चिपळूण तालुक्यातील 13 गावांसाठी 268 कोटी प्राप्त झाले आहेत. मात्र अजूनही 77 कोटीची आवश्यकता असून तशी मागणी करण्यात आली आहे. मुळातच जिल्हय़ातील कशेडी ते सिंधुदुर्गतील झारापपर्यंत मार्गाच्या चौपदरीकरणासाठी निविदा जाहीर करून ठेकेदारही निश्चित केले आहेत. मात्र जमीन मोबदला न दिल्याने ठेकेदार कंपन्या काम करण्यास तयार झालेल्या नाहीत. त्यातच जवळपास 80 टक्के भूसंपादन झाल्याशिवाय कामाला प्रारंभ करता येत नसल्याने त्या दृष्टीने मोबदला वाटप आणि जागा ताब्यात याबाबतची प्रक्रिया पूर्णत्वास गेल्यानंतरच चौपदरीकरणाच्या दृष्टीने पुढील पावले टाकली जाणार आहेत.

सद्यस्थितीत जमिनीच्या मोबदला वाटपाचे काम सुरू झाले असून चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कंपन्याही येथे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे मोबदला वाटपानंतर लगेचच कामाला प्रारंभ होईल, अशी शक्यता काहींनी वर्तवली होती. तसे पाहिले तर काम सुरू करण्याबाबतचे आदेश अजूनही कंपन्यांना दिले गेलेले नाहीत. मोबदला वाटपानंतर जागा ताब्यात दिल्याची कागदपत्रे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे सुपूर्द केल्यानंतर तसे आदेश दिले जाणार आहेत. तसेच ऍग्रीकल्चर, फॉरेस्टसह विभागाच्या परवानग्या, त्याबाबतची आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात पावसाळय़ाचा कालावधी या कंपन्यांना उपयुक्त ठरणारा असल्याने या कालावधीत मोबदला, आवश्यक परवानग्या यांची पूर्तता करून 1 सप्टेंबरपासून चौपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ केला जाणार आहे. त्या दृष्टीने बांधकाम कंपन्यांनी तयारी चालवली असल्याची माहिती या अधिकाऱयांकडून प्राप्त झाली आहे.