|Friday, July 19, 2019
You are here: Home » क्रिडा » …तर बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयात खेचू!

…तर बीसीसीआयला सर्वोच्च न्यायालयात खेचू! 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणीने दि. 7 मे रोजी होणाऱया त्यांच्या सर्वसाधारण बैठकीत ‘क्रिकेटच्या हिताविरोधात’ निर्णय घेतला तर आम्ही याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, असा सज्जड इशारा प्रशासक समितीचे सर्वेसर्वा विनोद राय यांनी दिला आहे. इंग्लंडमध्ये पुढील महिन्यात होणाऱया आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याबाबत बीसीसीआय विचाराधीन असल्याचे वृत्त असून त्या पार्श्वभूमीवर राय यांनी प्रशासकीय समितीची भूमिका बुधवारी जाहीर केली.

प्रशासक समितीच्या परवानगीशिवाय, बीसीसीआयला कोणत्याही निर्णयाप्रत येता येणार नाही, असे विनोद राय यांनी मंगळवारी नमूद केले होते. पण, त्यानंतरही बीसीसीआय बहिष्कार टाकण्याविषयी गांभीर्याने विचार करत असल्याचे वृत्त थडकल्यानंतर याचाही राय यांनी यावेळी समाचार घेतला.

‘भारतीय क्रिकेटचे हित जपणे, हा आमचा प्राधान्यक्रम आहे आणि दुर्दैवाने बीसीसीआयने काही चुकीचा निर्णय घेतला तर आम्हाला त्याची गांभीर्याने दखल घ्यावीच लागेल. अशा परिस्थितीत आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे त्याकडे लक्ष वेधू आणि प्रसंगी न्यायालयाने याबाबत निर्देश द्यावेत, अशी विनंती देखील करु’, असे विनोद राय पुढे म्हणाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची 570 दशलक्ष डॉलर्सची मागणी अवास्तव आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ‘2014 मध्ये ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार, महसूल विभागणीच्या धोरणाला आयसीसी व अन्य संलग्न क्रिकेट मंडळांची अजिबात परवानगी मिळू शकणार नाही. या धर्तीवर मंडळाने लवचिक भूमिका घेऊन वादावर पडदा टाकण्याची गरज आहे’, याचा त्यांनी शेवटी उल्लेख केला.