|Tuesday, October 23, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » फुटक्या तलावात पोहताना मुलाचा मृत्यू

फुटक्या तलावात पोहताना मुलाचा मृत्यू 

प्रतिनिधी/ सातारा

येथील फुटक्या तलावात भर दुपारी पावणे तीन वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी गेलेल्या जहीद आशफाक शेख (वय 15) रा. केसरकर पेठ, सातारा याचा कमरेला बांधलेल्या कॅन निसटल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली. त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, उन्हाळ्य़ाचे दिवस असल्याने व दुपारी प्रचंड उकाडा असल्याने अनेक मुले ही नदीपात्रात कॅनॉलमध्ये तसेच पोहण्याच्या तलावात पोहण्याचा आनंद घेतात. सातारा शहरात असणाऱया फुटक्या तलावातही अनेकजण पोहण्यासाठी येत असतात. केसरकर पेठेतील जहीद अशफाक शेख हा सुद्धा आपल्या मित्रांसमवेत पोहण्यासाठी फुटका तलाव येथे दुपारी पावणेतीनच्या दरम्यान आला. परंतु जहीदला पोहता येत नव्हते. त्यामुळे त्याने कमरेला कॅन बांधला व पाण्यात उडी मारली. परंतु कॅनची गाठ घट्ट न बसल्याने उडी मारताच कॅनची गाठ सुटली. त्यामुळे जहीद पाण्यात पडताच बुडू लागाला. त्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. परंतु आसपास कोणीच नव्हते. त्याला बुडताना पाहून काहीजणांनी वाचवण्यसाठी त्याच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. परंतु तोपर्यंत जहीद पाण्यात बुडून गेला. त्याला वर काढल्यानंतर छाती दाबून पोट दाबून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. व तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत फार उशिर झाला होता. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. 

फुटक्या तलावात पोहणे घातक

दर उन्हाळ्यात फुटक्या तलावात बुडून मृत पावणाऱयांची संख्या अधिक आहे. येथे कोणीही प्रशिक्षक तसेच पोहण्याचे योग्य प्रशिक्षण व साधनसामग्री उपलब्ध नाही. तरीही येथे मोठय़ा प्रमाणावर पोहण्याठी मुले येत असतात व त्यामधूनच हे अपघात घडत आहेत. त्यामुळे नगरपालिकेने पैसे खर्च करुन येथे पूर्णवेळ प्रशिक्षक नेमणे तसेच अन्य साधनसामग्री नेमणे गरजेचे असल्याचे मत अनेक स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

Related posts: