|Tuesday, October 16, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » वापर होत नसलेल्या विहिरींसंबंधी अहवाल पाठविण्याची सूचना

वापर होत नसलेल्या विहिरींसंबंधी अहवाल पाठविण्याची सूचना 

प्रतिनिधी/ काणकोण

काणकोण तालुक्यात बहुतेक सर्व पंचायत क्षेत्रांमध्ये सार्वजनिक उपयोगासाठी बांधलेल्या विहिरी वापराविना पडून आहेत. या सर्व विहिरींविषयीचा अहवाल त्वरित पाठविण्याची सूचना जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी जलस्रोत खात्याच्या अधिकाऱयांना दिली आहे. 

‘आमची विहीर’ ही नवी योजना गोवा सरकारने तयार केलेली असून या योजेनच्या माध्यमातून लोलये – पोळे पंचायतीमधील विनावापर पडून असलेल्या सर्व विहिरींची दुरुस्ती करून त्या वापरात आणण्याच्या दृष्टीने लक्ष दिले जाणार आहे. या ठिकाणी पूर्वजांनी आपआपल्या बागायती त्याचप्रमाणे शेतजमिनीत कित्येक विहिरी बांधून ठेवलेल्या आहेत. अशा काही विहिरींची पाहणी जलस्त्रोतमंत्री पालयेकर यांनी नुकतीच केली.

सदर विहिरी वापरात न आल्यामुळे त्यावर झुडुपे वाढलेली आहेत. भरपूर पाण्याचा स्त्रोत असूनही या विहिरी विनावापर पडून आहेत. या विहिरींची साफसफाई करून पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि जलसिंचनासाठी करण्यात येणार आहे. पोळे येथील शेतात असलेल्या एका विहिरीत पाण्याचा भरपूर साठा असल्याची माहिती यावेळी बाळकृष्ण कुडचडकर, दीपक पागी, सरपंच भूषण प्रभुगावकर यानी जलस्रोतमंत्र्यांना दिली. गोवा फॉरवर्डचे प्रशांत नाईक, मोहनदास लोलयेकर, माजी आमदार विजय पै खोत आणि अन्य नागरिकही उपस्थित होते.

Related posts: