|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » सर्वोच्च न्यायालयाचा लालूप्रसादांना दणका

सर्वोच्च न्यायालयाचा लालूप्रसादांना दणका 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कोटय़वधी रुपयांचा बहुचर्चित चारा घोटाळाप्रकरणी सोमवारी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला. या प्रकरणातील विविध प्रकरणांची सुनावणी स्वतंत्रपणे करण्यात यावी, अशा सीबीआयने केलेल्या मागणीला न्यायालयाने मान्यता दिली. त्यामुळे आता लालूप्रसाद यादव यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचल्याचा खटला चालणार आहे. तसेच या खटल्याचे काम नऊ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यांना दिलेल्या सवलतीवरही न्यायालयाने ताशेरे ओढले. तसेच सीबीआयनेही केलेल्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली.

 1990 मध्ये लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री असताना पशुपालन विभागात चारा घोटाळा झाला होता. याप्रकरणी विविध खटले सुरू आहेत. एका खटल्यात सत्र न्यायालयाने यादव यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला लालूप्रसाद यादव यांनी सर्वोच्च न्यायालयाने आव्हान दिले होते. संबंधितांना एक महिन्यात आपली बाजू मांडावी, असे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व याचिकांचा निकाल 20 एप्रिल रोजी राखून ठेवला होता. आता न्यायालयाच्या मान्यतेनंतर गुन्हेगारी कट रचल्याचा खटला लालूप्रसाद यांच्यासह जग्गनाथ मिश्रा, माजी सनदी अधिकारी संजय चक्रवर्ती याच्याविरोधात चालणार आहे.

Related posts: