|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सरकार, भाजपाची तळी उचलण्या एवढा शक्तीमान नाही

सरकार, भाजपाची तळी उचलण्या एवढा शक्तीमान नाही 

प्रतिनिधी/ इस्लामपूर

खा.राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रेसाठी पाहूण्यासारखे येऊ नये, हा सल्ला मला एकटय़ासाठी दिला नसून सर्व कार्यकर्त्यांसाठी दिला आहे. सध्या उन्हांमुळे चक्कर येत असल्याने आपण अधुन-मधून यात्रेत सहभागी होणार आहे. खा.शेट्टी हे संघटनेचे नेते आहेत. मी कार्यकर्ता आहे. संघटना पातळीवर त्यांचे व माझे संबंध चांगले आहेत, अशी मवाळ भूमिका घेतानाच सरकारची तळी उचलण्या एवढा मी शक्तीमान नाही. भाजपा मोठा पक्ष आहे. त्यामुळे मी तळी उचलणारा कोण? असा  चिमटा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकार बैठकीत काढला.

खा.शेट्टी हे आत्मक्लेश यात्रेबाबत मला उद्देशून बोललेले नाहीत. मी प्रसार माध्यमांवरील त्यांचे वक्तव्य बारकाईने ऐकले आहे. त्यांची तब्येत बरी नसते, असे ते म्हणाले. मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे शेतकरी, श्रमीकांची चळवळ टिकली पाहिजे. खा.शेट्टी हे चळवळीत घडले आहेत. त्यांनी चळवळीतून आमदारकी, खासदारकी मिळवली आहे. त्यांनी अनेक गुन्हे अंगावर घेतले आहेत. शेतकरी नेता म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे. दिवगंत शरद जोशी व त्यानंतर मेधा पाटकर यांच्यापासून रघुनाथदादा पाटील यांच्यापर्यंत अनेकजण चळवळ पुढे नेत आहेत. आता चळवळीसाठी मला वेळ देता येत नसेल, तर त्यांच्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. पण आरेला-कारे म्हणण्याचा माझा स्वभाव आहे.  मात्र त्यांच्या व्यक्तीगत जीवनात डोकावून पाहत नाही. त्यांना कमी लेखत नाही, अशी काहीशी मवाळ व मार्मिक भूमिका त्यांनी व्यक्त केली.

भविष्यात कुणी इतिहास लिहिलाच तर सदाभाऊ खोत हा विकासात खिळ घालणारा असे लिहिले जाणार नाही, असे सांगून खोत म्हणाले, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी, डॉ.एन.डी.पाटील, लोकनेते राजारामबापू पाटील, अण्णासाहेब डांगे यांनी ज्या पध्दतीने विकासाभिमुख व सामान्य केंद्रस्थानी ठेवून काम केले. त्याच पध्दतीने मी काम करीत आहे. हे काम करीत असताना कोण आपला, कोण परका हे पाहत नाही. मध्यंतरीचा काळ मात्र वाळवा तालुक्यात आडवा-आडवी, जिरवा-जिरवीचा आला. अनेक योजना व कामे अडवण्याचा उद्योग झाला, अशी टिका आ.जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांनी केली.

भ्रष्ट उद्योजकांना बेडय़ा ठोकू

खोत पुढे म्हणाले, वाळवा तालुक्यात लवकरच चार चांगले उद्योग आणले जाणार आहेत. त्यातून रोजगार निर्मिती करण्यात येईल. पाठीमागील काळात ज्या उद्योजकांनी शासनाचे अनुदान हडप करण्यासाठी उद्योग उभारले. त्यांची चौकशी करण्यात येईल. शिवपूरी रस्त्याला एक स्टील कारखाना झाला. त्याची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. या कारखान्यातील यंत्रसामुग्रीच्या पावत्या  मिळून येत नाहीत. ज्या पावत्या मिळाल्या आहेत, त्यांची यंत्र सामुग्री जागेवर नाही. या प्रकल्पाच्या मुख्य सुत्राधारापर्यंत पोहचून त्याच्या हातात बेडय़ा ठोकण्यात येतील. तालुक्यात कापड उद्योगात ही काहींनी असे अनुदाने आणली आहेत. एकाच आवारात अनेक संस्था काढून सारा गोलमाल केला आहे. बाहेर फलक वेगळा व आत संस्था वेगळी अशी स्थिती आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील जनावरांचा बाजाराची जागा हडप करुन त्याचा वापर अन्य उद्देशासाठी केला जात आहे. त्याबाबतचा अहवाल लवकरच प्राप्त होणार असून त्यानंतर पणन खात्यास कारवाईचे आदेश देण्यात येतील.

क्षारपड व ठिंबकसाठी चांगला निर्णय

ना.खोत म्हणाले, सरकारमध्ये असल्याने अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेता आले. या सर्व कामांचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावे लागेल. त्यांनी अन्नप्रक्रिया अभियान सुरु करण्यात मान्यता दिली. नाबार्ड अंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱयांना ठिंबक योजनेसाठी अवघ्या दोन टक्के व्याजदराने अनूदान देण्याचा निर्णय घेतला. जागतिक बँकेच्या सहाय्याने नानासाहेब देशमुख कृषी प्रकल्प राबवण्यास मान्यता दिली. या प्रकल्पातंर्गत पहिल्या टप्यात विदर्भातील सहा जिल्हे, मराठवाडय़ातील आठ जिल्हे येथील काम होईल. पुढील टप्यात सोलापूर, सांगली, सातारा, नगर हे जिल्हे असतील. क्षारपड जमिनी सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतानाचा संबंधीत शेतकऱयांना बियाणे व खतांसाठीही अनुदान दिले जाईल. ग्रामपंचायत व अन्य संस्थांच्या माध्यमातून वेअर हाऊस उभारण्यात येणार आहेत. शेतातून थेट व्यापाऱयांचा हातात जाणारा माल रोखला जाईल. यासाठी कर्जतारण योजना राबवून माल आल्यानंतर 24 तासात 75 टक्के कर्जपुरवठा केला जाईल. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, नगरसेविका कोमल बनसोडे, दि.बा.पाटील, मुकुंद कांबळे उपस्थित होते.

Related posts: